मुंबई - शेतकऱ्यांच्या सर्व मुलांनी शेती न करता, एकाने शेती करावी, तर दुसऱ्या मुलानं उद्योग किंवा इतर क्षेत्रात जावं, असा मोलाचा सल्ला माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या मुलाला दिलाय. आता जमीन कमी होत आहे, लोकसंख्या वाढली आहे, शेतीजमीन दिवसेंदिवस कमी होते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी याचा विचार करण्याचा सल्लाही शरद पवारांनी दिला. कराड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील प्रितीसंगम या समाधीस्थळावर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर, तेथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी, राज्यातील राजकीय परिस्थिती आणि घडामोडींवर भाष्य करताना शेतकऱ्यांच्या मुलांनाही पवारांनी मोलाचा सल्ला दिलाय. तसेच, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीची शपथ घेतली म्हणून काही होत नाही. अजून सत्ता स्थापन करून बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. ते 30 तारखेला समजेल, असे मतही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, सारंग पाटील, सौरव पाटील उपस्थित होते. भाजपाने सत्तास्थापनेच्या हालचाली केल्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तरीही त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. ते त्यांना करता येणार नाही. तर कोणत्याही परिस्थितीत शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेसचेच सरकार अस्तित्वात येईल असा ठाम विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.