मराठीसाठी पश्चिम रेल्वेचे एक पाऊल पुढे

By Admin | Published: April 26, 2017 12:21 AM2017-04-26T00:21:12+5:302017-04-26T00:21:12+5:30

पश्चिम रेल्वे स्थानकावरील पाट्यांमध्ये मराठीचा वापर होत नसल्याने यापूर्वी आंदोलने झाली आहेत. त्यातच अपभ्रंश आणि चुकीच्या

One step ahead of Western Railway for Marathi | मराठीसाठी पश्चिम रेल्वेचे एक पाऊल पुढे

मराठीसाठी पश्चिम रेल्वेचे एक पाऊल पुढे

googlenewsNext

मीरा रोड : पश्चिम रेल्वे स्थानकावरील पाट्यांमध्ये मराठीचा वापर होत नसल्याने यापूर्वी आंदोलने झाली आहेत. त्यातच अपभ्रंश आणि चुकीच्या उल्लेखांमुळे अनेकांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केल्या. याची दखल घेत पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागविली आहे. यानिमित्ताने पश्चिम रेल्वेने एक पाऊन पुढे टाकले आहे.
भार्इंदर स्थानकाचा हिंदी व इंग्रजीतून भायंदर असा सर्रास अपभ्रंश केला जात आहे. शिवाय मराठीतूनही भायंदर असे लिहीले जात होते. मध्यंतरी तर गुजराती भाषेत भार्इंदर अशी पाटी लावण्यात आली. महसूली नोंदी भार्इंदर असे नाव असताना त्याचा हिंदी वा इंग्रजीतून भार्इंदर असाच उल्लेख व्हायला हवा अशी अनेक वर्षापासून शिवसेना, मनसेची मागणी होत होती. महासभेतही ठराव करण्यात आला. परंतु, नंतर याचा पाठपुरावा केला नाही.
दरम्यान, मराठी एकीकरण समितीने भार्इंदर सह वांद्रे, परळ अशी मराठमोळी नावे असताना त्याचा हिंदी, इंग्रजीतून चालणारा अपभ्रंश रोखण्यची मागणी मुख्यमंत्र्यांसह रेल्वे प्रशासनाकडे चालवली होती. तसेच आरक्षण अर्ज, इतर अर्ज मराठीत उपलब्ध करावेत, तिकीटे व पास मराठीतून द्यावेत, सर्व उद्घोषणा, सर्व माहिती फलकांमध्ये मराठीला प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी समितीने उपोषण, धरणे आंदोलन, स्वाक्षरी मोहीम तसेच निषेध आंदोलने केली.
पश्चिम रेल्वेने ही बाब गांभीर्याने घेत रेल्वे स्थानकांच्या नावांमध्ये असणारा मराठीचा अपभ्रंश थांबवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या वरिष्ठ व्यवस्थापक आरती सिंह- परिहार यांनी मुंबईचे जिल्हाधिकारी तर मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी यांना सहा एप्रिलला पत्र पाठवून त्यांच्या हद्दीत येणाऱ्या रेल्वेस्थानकांची मूळ महसूली नोंदी असलेली मराठीतील नावे व त्याचे शब्दलेखन मागवले आहे.
रेल्वेस्थानकांच्या नावांचा चुकीचा उल्लेख होत असल्याबद्दल प्रवासी आणि संस्थांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. रेल्वे स्थानकांच्या नावांची मंजुरी राज्य सरकारकडून होत असते. त्यामुळे महसूली नोंदी असलेली नावे द्यावीत जेणेकरून नावात सुधारणा करायची गरज असल्यास ती करता येईल, असे रेल्वेने म्हटले आहे.रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाने येथील प्रवासी तसेच नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: One step ahead of Western Railway for Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.