एका गोष्टीचं माझ्या मनात शल्य, रामदास कदमांनी सांगितली 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 08:53 PM2021-12-27T20:53:34+5:302021-12-27T21:06:06+5:30
विधानपरिषदेतील कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांना आज निरोप देताना पायऱ्यांवरील फोटोमध्ये त्यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, त्याहीपेक्षा त्यांनी विधानपरिषदेत केलेलं शेवटचं भाषणही भावूक होतं
मुंबई - माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मंत्री अनिल परब यांच्यावर टीकास्त्र सोडल्यामुळे, त्यानंतर विधिमंडळात एंट्री करताना गेटवरच त्यांना अडवल्यामुळे रामदास कदम यांची शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर, आज विधानपरिषदेतील आपल्या शेवटच्यादिवशी त्यांनी मोठं भाषण केलं. या भाषणात राजी, नाराजी, समाधान आणि अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच, शिवसेनेच्या गप्रमुखापासूनचा आपला प्रवासही उलगडला. तर, आपल्या मनातील शल्यही विधानसभेत बोलून दाखवले.
विधानपरिषदेतील कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांना आज निरोप देताना पायऱ्यांवरील फोटोमध्ये त्यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, त्याहीपेक्षा त्यांनी विधानपरिषदेत केलेलं शेवटचं भाषणही भावूक होतं. यामध्ये, त्यांनी सर्वकाही सांगितलं. ''पक्षामुळे व्यक्ती मोठी होते, व्यक्तीमुळे पक्ष नाही. मी गेल्या अनेक वर्षांपासून याचा अनुभव घेतला, 52 वर्षांपासून मी शिवसेनेचं काम करत आहे. एक शिवसैनिक, गटप्रमुख ते राज्याचा मंत्री इथपर्यंत मी काम केलं, शिवसेनाप्रमुखांच्या सोबत काम करायला मिळालं हे मी भाग्य समजतो. शिवसेनाप्रमुखांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचं काम मी केलंय, असे रामदास कदम यांनी म्हटलं. तसेच, एका गोष्टीचं माझ्या मनात शल्य आहे, ते मुद्दाम मी सांगतोय,'' असे म्हणत त्यांनी अपेक्षाही व्यक्त केली.
माझ्या कोकणासाठी सिंचन व्यवस्था आहे, ती स्वातंत्र्यानंतर केवळ 1.5 टक्के आहे. मी अनेकदा प्रयत्न केले. अगदी मंत्री असताना अनेकवेळा हा विषय मी कॅबिनेटमध्ये लावून धरला. पण मला त्यात यश मिळालं नाही. सर्वात जास्त पाऊस कोकणात आहे, पण कोकणावरच अन्याय होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात सिंचन 55 टक्के आहे, पण सर्वाधिक पाऊस असलेल्या कोकणात केवळ 1.5 टक्के याचं दु:ख माझ्या मनात आहे, असे रामदास कदम यांनी विधानसभेत बोलताना मत व्यक्त केलं. भविष्यात, या सभागृहाच्या माध्यमातून मला न्याय मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
असं काम माझ्याकडून होणार नाही
मला पक्षाने पुष्कळ दिलं, कधी कधी कुटुंबात भांड्याला भांड लागत असतं. त्याचा विपर्यास करण्याचं कारण नाही, भांडणं थोडेसं होतात, ते तात्पुरते असतात. मी तापट आहे, तेवढाच मवाळही मी आहे. माथाडी कामगार असू देत, किंवा भारतीय कामगार सेनेतही मी काम केलंय. पक्षाने जी जबाबदारी मला दिली ती मी पार पाडली. मी 2.5 वर्षांपूर्वीच एका पत्रकार परिषदेत मी रिटायरमेंट घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता माध्यमातून वेगळ्याच बातम्या येत आहेत. तरुणांना संधी मिळावी म्हणून मी निवृत्त होतोय, माझा मुलगा आज आमदार आहे. मी पूर्ण समाधानी आहे, कुठलंही दु:ख माझ्या मनामध्ये नाही. शिवसेनाप्रमुखांचं शेवटचं भाषण होतं, माझ्यानंतर माझ्या उद्धवला साथ द्या. म्हणून मी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला सांगतोय, शिवसेनाप्रमुखांच्या आत्म्याला दु:ख होईल, असं कोणतंही काम माझ्याकडून होणार नाही, असे म्हणत रामदास कदम यांनी हात जोडून सभागृहात शेवटचं भाषण संपवलं.