एक कोटीचे सोने चोरणारे गजाआड
By admin | Published: September 16, 2015 01:20 AM2015-09-16T01:20:42+5:302015-09-16T01:20:42+5:30
शिवडी येथील सुवर्ण कारागिराच्या कारखान्यातील एक कोटीचे कच्चे सोने घेवून लंपास झालेल्या कामगारासह तिघा चोरट्यांचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छडा लावला आहे.
मुंबई : शिवडी येथील सुवर्ण कारागिराच्या कारखान्यातील एक कोटीचे कच्चे सोने घेवून लंपास झालेल्या कामगारासह तिघा चोरट्यांचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छडा लावला आहे. रमेशकुमार कुमावत (वय १९),घेवरचंद सुतार (वय ३०, दहिसर पूर्व),भीमदास वैष्णव (४२, तिघे मुळचे जालोर ,राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. महेंद्रकुमार हा फरार आहे.
गोपाळ टाक यांचे शिवडीतील भुसा उद्योग भवनातील दुसऱ्या मजल्यावर दुकान आहे. रमेशकुमार गेल्या १४ महिन्यांपासून त्यांच्याकडे कामाला होता. साधारण वर्षभरापासून त्याने तिघा सहकाऱ्यांसमवेत मालकाच्या कारखान्यातून सोने चोरुन पलायन करण्याचे ठरविले होते. दहीहंडीच्या दिवशी पोलीस बंदोबस्तात व्यस्त असतात. त्यामुळे यादिवशी दुपारी तीनच्या सुमारास कारखान्यातील तिजोरीचे कुलूप तोडून ४ किलो १४२ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लगडी काढून घेतल्या. त्याची एकूण किंमत १ कोटी १ लाख २४ हजार इतकी होती, गुन्हे पथकाच्या कक्ष-४चे निरीक्षक अशोक जाधव, सुनील जाधव, श्रीकांत रामदास, सहाय्यक निरीक्षक अभिजीत शिंदे, उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड आदीच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार कामगार रमेशकुमार याला मुंबईत तर दोघा साथीदारांना राजस्थानमधून पकडले.