ठाणे : शिक्षणाचे धडे गिरविण्याच्या वयात घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे बहुधा चिमुरड्यांना कामाला जुंपले जाते. मात्र, कामाच्या ठिकाणावरून सुटका झाल्यावर भविष्यात तशी परिस्थिती येऊ नये, म्हणून त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम बालकामगार निर्मूलन प्रकल्पाद्वारे सुरू आहे. त्यानुसार, जिल्ह्यात चालू वर्षात एक हजार २४३ बालकामगार शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. यामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या ५० ने अधिक असल्याचे दिसून येते. ही आकडेवारी १२ जूनच्या जागतिक बालकामगारविरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला समोर आली आहे. कोवळ्या वयातच बालपण हरवलेल्या अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम बालकामगार निर्मूलन प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येते. तसेच त्यांना किमान शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व ते साक्षर व्हावे, या उद्देशाने केंद्र सरकारने बालकामगार निर्मूलन प्रकल्प सुरू केला आहे. त्यानुसार, १२ सामाजिक संस्थांकडून २८ प्रशिक्षण केंद्रांतून प्रशिक्षण दिले जाते. या कें द्रांमधून सन २०१३-१४ या वर्षात १ हजार १९१ बालकामगारांपैकी १९८ जणांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यात यश आले होते. तर, सन २०१४-१५ या वर्षी ६५० बालकामगारांपैकी २३६ मुले-मुली हे प्रशिक्षण घेत आहेत. त्यातच यंदाच्या २०१५-१६ वर्षात ५९६ मुले तर, ६४७ मुली अशी सुमारे एक हजार २४३ मुले-मुली शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. तसेच या बालकांना विद्यावेतन म्हणून दरमहा १५० रु पये देण्यात येत असल्याची माहिती बालकामगार निर्मूलन प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली.
एक हजार २४३ बालकामगार शिक्षणाच्या प्रवाहात
By admin | Published: June 11, 2015 11:01 PM