मुंबईत मंगळवारी कोरोनाचे एक हजार ७१७ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:06 AM2021-05-12T04:06:47+5:302021-05-12T04:06:47+5:30
मुंबई : मुंबईत दैनंदिन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत मागील चोवीस तासांत अवघे एक ...
मुंबई : मुंबईत दैनंदिन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत मागील चोवीस तासांत अवघे एक हजार ७१७ रुग्णांचे निदान झाले असून, ५१ मृत्यूंची नोंद झाली आहे तर त्या तुलनेत मंगळवारी बरे झालेल्या संख्या अधिक असून, तब्बल सहा हजार ८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहर उपनगरात आतापर्यंत एकूण सहा लाख २३ हजार ८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबईत सध्या ४१ हजार १०२ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १७० दिवसांवर येऊन ठेपला आहे. ४ ते १० मे या कालावधीत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.३९ टक्के असल्याची नोंद आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण संख्या सहा लाख ७९ हजार ९८६ असून, बळींचा आकडा १३ हजार ९४२ इतका आहे.
कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात २८ हजार २५८ चाचण्या करण्यात आल्या, तर आतापर्यंत एकूण ५७ लाख ६१ हजार ६८९ कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या ८१ आहे तर ४७९ सक्रिय सीलबंद इमारती आहे. मागील चोवीस तासांत रुग्णांच्या संपर्कातील २४ हजार ८९८ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.