पहिल्या दिवशी एक हजार ९२६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचेे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:07 AM2021-01-17T04:07:20+5:302021-01-17T04:07:20+5:30
मुंबई : कोरोनावरील लसीकरणाच्या पहिल्या दिवशी चार हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस देण्याचे लक्ष्य मुंबई महापालिकेने ठेवले होते. त्यानुसार पालिकेच्या ...
मुंबई : कोरोनावरील लसीकरणाच्या पहिल्या दिवशी चार हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस देण्याचे लक्ष्य मुंबई महापालिकेने ठेवले होते. त्यानुसार पालिकेच्या नऊ आणि राज्याच्या एका केंद्रातून शनिवारी सकाळी लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. मात्र पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत एक हजार ९२६ जणांना लस देण्यात आली.
शनिवारी दुपारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, परळ येथील केईएम रुग्णालयात २४३, सायन १८८, नायर १९०, विलेपार्लेच्या कूपर रुग्णालयात २६२, वांद्रे येथील भाभा रुग्णालयात १४९, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालयात ८०, घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात २८९, कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात २६६ आणि बीकेसी केंद्रात २२०, तर जेजे रुग्णालयात ३९ जणांना लस देण्यात आली.
* यांना मिळाली पहिली लस
रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी
केईएम - उपअधिष्ठाता डॉ. मिलिंद नाडकर, सायन - अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, नायर - अधिष्ठाता, पालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. रमेश भारमल, कूपर - माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, वांद्रे - भाभा - वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे, व्ही. एन. देसाई - वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव कारंथ, राजावाडी - वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर, कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय - वैद्यकीय अधिकारी ऋजुता बारस्कर, बीकेसी कोविड सुविधा केंद्र - आहारतज्ज्ञ डॉ. मधुरा पाटील.
लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी ‘काेविन’
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी उदा. स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस तर, तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील सर्व नागरिक तसेच ५० वर्षांखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब, इत्यादी) असणारे नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांसाठी केंद्र शासनाने कोविन हा डिजिटल मंच विकसित केला आहे. त्या माध्यमातून लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.
.............................