मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) एमएमआरडीए मैदानाचा वापर आता कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी एक हजार बेड्सची व्यवस्था करण्यात येत आहे. यामुळे या ठिकाणी एक हजार जणांना क्वारंटाइन अथवा आयसोलेशन करता येणार आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात हॉस्पिटलमधील उपलब्ध बेड्सची संख्या कमी पडू नये म्हणून ही संख्या वाढवण्यात येत आहे. यासाठी बीकेसीमधील एक्झिबिशन मैदानामध्ये एक हजार बेड्सची व्यवस्था करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. भविष्यात येथे पाच हजार बेड्सपर्यंत वाढ करता येणार आहे. मुंबई महापालिकेने शहरातील कटेन्टमेंट झोन पाहता आणि लोकसंख्येची घनता पाहता ज्या ठिकाणी मोठ्या क्षमतेच्या बेड्सची व्यवस्था करता येईल अशा ठिकाणांची निवड केली आहे.त्यामध्ये गोरेगाव नेस्को, वरळीतील एनएससीआय यासारख्या ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणीसुद्धा एक हजारांहून अधिक बेड्सची व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. एमएमआरडीए मैदानातील जागेचा वापर हा तात्पुरत्या रुग्णालयासाठी होणार आहे. या ठिकाणी सर्व प्रकारच्या सेवासुविधा तसेच रुग्णखाटांसह डॉक्टर आणि नर्सेस, तसेच वॉर्डबॉय आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे. रुग्णांच्या आयसोलेशन सुविधेसाठी ही सुविधा उभारण्यात येत आहे. एक हजार खाटांची, प्राणवायूच्या सुविधेसह पर्यायी यंत्रणा उभी केली जात आहे. येथील प्रत्येक खाटांना आॅक्सिजनची यंत्रणा आहे.>सर्वांना सोयीचे ठरणारपूर्व आणि पश्चिम उपनगरात मध्यवर्ती ठिकाणी असे एमएमआरडीएचे मैदान आहे. तसेच पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांची कनेक्टिव्हिटी पाहता या एमएमआरडीए मैदानाची कनेक्टिव्हिटी रुग्णांची ने-आण करण्यासाठी सोयीची अशी आहे.
बीकेसीतील मैदानात होणार एक हजार खाटांची व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 1:35 AM