लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हृदयविकाराच्या उपचारासाठी ११ दिवसांच्या चिमुकलीने गंभीर अवस्थेतही एका दिवसात १००० किलोमीटरपेक्षा जास्त कार्डियाक ॲम्ब्युलन्समधून जयपूर ते मुंबई असा प्रवास केला. जन्मजात हृदयरोग असल्याने १००० हून अधिक किलोमीटरचा प्रवास करणे खूप आव्हानात्मक होते.
चिमुकलीला जन्मजात हृदयरोग - ट्रान्पोझिशन ऑफ ग्रेट आर्टरीज (शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्या चुकीच्या पद्धतीने जोडलेल्या) असल्याचे निदान झाले. हृदयाला रक्तपुरवठा करणारी मुख्य रक्तवाहिनी चुकीच्या जागी जोडली गेलेली असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असते. स्थानिक रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळाला मुंबईला नेण्याचा सल्ला कुटुंबाला दिला होता.
नारायण हेल्थच्या एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे कार्डियाक सर्जरी, पेडियाट्रिकचे सिनिअर कॅन्सल्टंट डॉ. प्रदीप कौशिक म्हणाले, सुरुवातीला जेव्हा आम्ही तपासणी केली तेव्हा बाळाची ऑक्सिजनची पातळी ७५ होती आणि आम्ही त्याच्या रक्तवाहिन्या पुन्हा जोडण्यासाठी तातडीची ओपन हार्ट सर्जरी केली. या ओपन हार्ट सर्जरीच्या वेळी हृदयाचे काम कृत्रिमरीत्या सुरू ठेवण्यासाठी आर्टरियल स्वीच पद्धतीचा वापर केला. शस्त्रक्रियेला साधारण सात तास लागले आणि शस्त्रक्रियेनंतर पाच दिवसांतच बाळाला घरी सोडण्यात आले.