गोविंदा पथकांनी लावले रक्त बाटल्यांचे एक हजार थर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 01:47 AM2020-08-10T01:47:27+5:302020-08-10T01:47:35+5:30
सामाजिक भान राखत उपक्रमाचे आयोजन; रक्तदान शिबिरात गोविंदांनी घेतला हिरिरीने सहभाग
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा करणे शक्य नसल्याने दहीहंडी समन्वय समितीने शहरातील गोविंदा पथकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी मुंबईतील विविध गोविंदा पथकांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून तब्बल एक हजारपेक्षा अधिक रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करत अनोखी सलामी दिली. यामध्ये गोविंदांसह गोपिकाही मोठ्या हिरिरीने सहभागी झाल्या होत्या.
राज्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषद व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत रक्तदान करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. रक्त आटेपर्यंत दहीहंडीचा सराव करणाऱ्या गोविंदा पथकांनी यंदा रक्तदान करावे, असा निर्णय दहीहंडी समन्वय समितीकडून घेण्यात आला.
मुंबईमध्ये रविवारी विविध ठिकाणी गोविंदा पथकाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातून हजारपेक्षा अधिक रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन मुंबईतील वडाळा येथील यश गोविंदा पथकाने २०० बाटल्यांचे रक्तसंकलन केले.
तर विलेपार्ले येथील पार्ले स्पोर्ट्स क्लब आणि पार्लेश्वर दहीहंडी पथक यांनी एकत्रित आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ८० बाटल्या, समस्त चुनाभट्टी गोविंदा पथकाने १११, जोगेश्वरीतील एमएमआरडीए वसाहत गोविंदा पथक ७१, आर्यन्स गोविंदा पथक १०१, साईराम गोविंदा पथक ३०७ रक्त बाटल्यांचे संकलन केले. या मंडळांबरोबरच जोगेश्वरीतील साई शाम मित्र मंडळ, कोकण नगर गोविंदा पथक, अंधेरीतील आंबोली गोविंदा पथक, सांताक्रुझचे सर्वोदय गोविंदा पथक, गिरणगावचा गोविंदा या पथकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. गोविंदा पथकांकडून आयोजित रक्तदान शिबिराला शहरातील गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गोविंदासह गोपिकांचाही पुढाकार
रक्तदान शिबिरांमध्ये शहरातील विविध ठिकाणांहून गोविंदांनी येऊन रक्तदान केले असले तरी यामध्ये गोंविदा- गोपिकाही उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. रक्तदानाच्या वेळी खबरदारी पाळण्यात आली असून सर्व नियमांचे पालनही करण्यात आले. भविष्यातही आणखी काही ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. सण साजरा होत नसला तरीही या सामाजिक उपक्रमातून कोरोना रुग्णांना मदतीचा हात देण्यात येत आहे. - बाळा पडेलकर, अध्यक्ष, दहीहंडी समन्वय समिती