लॅन्सेट अहवालातील धक्कादायक माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या देशात सर्वाधिक आहे. त्यातच आता काेराेनामुक्त झालेल्यांच्या सर्वेक्षणानंतर धक्कादायक माहिती समाेर आली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर सहा महिन्यांत तीनपैकी एकाला मेंदूविकाराशी निगडित (न्यूरॉलॉजिकल) किंवा मानसिक समस्या निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या न्यूरॉलॉजिकल आणि मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास या सर्वेक्षणातून करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर लॅन्सेट सायकायट्री जर्नलमध्ये याबाबत अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, कोरोनामुक्त झालेल्या २ लाख ३० हजारांहून अधिक लोकांच्या आरोग्याच्या नोंदी घेण्यात आल्या. त्यापैकी ३४ टक्के लोकांना सहा महिन्यांत मेंदूविकाराशी निगडित न्यूरॉलॉजिकल किंवा मानसिक समस्यांनी ग्रासले होते. १७ टक्के लोक अत्यंत चिंताग्रस्त, तर १४ टक्के लोकांमध्ये मूड डिसऑर्डरबाबतची लक्षणे आढळून आली. मनोविकाराशी कोरोनाचा काय संबंध आहे याबाबत अद्यापही स्पष्ट माहिती मिळालेली नाही; पण कोरोनामुक्त झालेल्या लोकांमध्ये चिंता आणि नैराश्य या दोन गोष्टी प्रामुख्याने आढळून आल्या, असे निरीक्षण संशोधकांनी नाेंदवले.
या सर्व लोकांमध्ये स्ट्रोक, स्मृतिभ्रंश आणि न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डरसारखी लक्षणेही आढळली; पण या लक्षणांचे प्रमाण कमी आहे. हे संशोधन खूप महत्त्वाचे मानले जात आहे. साधारणतः तीनपैकी एका कोरोनामुक्त व्यक्तीत असे आजार उद्भवत असल्याचे दिसून आले आहे.
मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. आस्था दासानी यांनी सांगितले की, मुंबईतही अशा स्वरूपाच्या तक्रारी असणाऱ्या काही नोंदी आहेत. मुख्यतः मेंदूतील न्यूरो केमिकल्स कोरोनाची लागण झाल्यावर बदलतात, त्यामुळे मेंदूविकाराचा धोका अधिक जाणवतो. त्याचप्रमाणे, काही ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीवर याचा खोलवर परिणाम झालेला असून यामुळे वागणुकीतही बदल दिसून येत असल्याचे रुग्णांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
मानसिक समस्यांचे प्रमाणही चिंताजनक
कोविडचा संसर्ग झाल्यानंतर किंवा पोस्ट कोविडच्या फेझमध्येही रुग्णांमध्ये मानसिक समस्यांचे प्रमाण वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. बऱ्याचदा कोविडशी निगडित शारीरिक व्याधींवर उपचार केले जातात, त्यासाठी रुग्ण किंवा नातेवाईक आग्रही असतात. परंतु, मानसिक समस्यांकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते. याविषयी, जनजागृतीचा अभाव असल्यानेही अनेकदा रुग्ण पुढाकार घेत नाहीत. मात्र यात कोणताही कमीपणा नसून हे उपचार किंवा मानसिक समस्यांच्या मुक्तीकडे टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. अशा समस्या भेडसावत असल्यास रुग्ण किंवा कुटुंबीयांनी पुढाकार घ्यावा.
- डॉ. मालिनी अग्रवाल, मानसोपचारतज्ज्ञ
..............................