एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टीकवर आजपासून बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 06:31 AM2019-10-02T06:31:00+5:302019-10-02T06:32:08+5:30
देशभरात बुधवार, २ आॅक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून एकदाच वापर होणाºया प्लास्टीकच्या वापरावर (सिंगल यूज प्लास्टीक) बंदी लागू झाली आहे.
मुंबई : देशभरात बुधवार, २ आॅक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून एकदाच वापर होणाºया प्लास्टीकच्या वापरावर (सिंगल यूज प्लास्टीक) बंदी लागू झाली आहे. त्यात थर्माकोलच्या वस्तू, तसेच प्लास्टीकचा वापर असलेले कप आणि अन्य वस्तूंचाही समावेश आहे. याशिवाय ५१ मायक्रॉनवरील पिशव्यांवरही ही बंदी आहे, परंतु प्लास्टीकच्या बाटल्यांना यातून वगळण्यात आले आहे.
प्लास्टीक पर्यावरणासाठी धोकादायक आहे, तरीही याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर, सरकारकडून प्लास्टीकवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारी निर्णयानुसार बुधवारपासून एकदाच वापर होणाºया प्लास्टीकचा वापर केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नव्या नियमानुसार दुधाच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारी ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टीक पिशवीवर पुनर्खरेदी किंमत व उत्पादकाचे नाव असणे गरजेचे आहे. तसेच प्लास्टीक, थर्माकोलवर पुनर्खरेदी किंमत व उत्पादकाचे नाव असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाड व दोन ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे सीलबंद प्लास्टीक पॅकेजिंग/आवरण असल्यास, त्यावर पुनर्खरेदी किंमत व उत्पादकाचे नाव प्रसिद्ध करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
यावर बंदी
प्लास्टीक व थर्माकोलचा वापर सजावटीसाठी करता येणार नाही.
थर्माकोल (पॉलिस्टायरिन) व प्लास्टीकपासून बनविण्यात येणाºया व एकदाच वापरल्या जाणाºया डिस्पोजेबल वस्तू (उदा. ताट, कप्स्, प्लेट्स, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडे इत्यादी), हॉटेल्समध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारी प्लास्टीकची भांडी, वाट्या, स्ट्रॉ.
सर्व प्रकारच्या प्लास्टीक पिशव्या (हँडल असलेल्या व नसलेल्या), २०० मिलीपेक्षा कमी द्रव धारण क्षमता असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पीईटी व पीईटीई बाटल्या, पिण्याच्या पाण्याच्या पिशव्या.
यावर बंदी नाही
प्लास्टीकचा एक थर असलेला पुठ्ठा किंवा खोका, विशेष आर्थिक क्षेत्र, निर्यातीसाठी विविक्षित उद्योग इत्यादीमध्ये फक्त निर्यातीसाठी वापरले जाणारे प्लास्टीक आवरणाचे उत्पादन.
वेष्टनासाठी वापरण्यात येणारे ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचे व २० टक्के पुनर्चक्रित प्लास्टीकपासून बनविलेले प्लॅस्टिक/थर्माकोलचे आवरण, पुनर्चक्रण होणारे मल्टिलेअर पॅकेजिंग (चिप्स पॅकेट, शॅम्पू सॅशे, तेल पॅकेट, चॉकलेट पॅकेट इत्यादी), घरगुती वापराची प्लास्टीक उत्पादने, औषधांचे वेष्टन, वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय उत्पादनांसाठी वापरण्यात येणारे प्लास्टीक.
मत्स व्यवसायात मासे टिकवून ठेवण्यासाठी वापरले जाणारे थर्माकोल बॉक्स, किरकोळ व घाऊक अन्नधान्य व किराणा माल, सीलबंद प्लास्टीक पॅकेजिंग/आवरण, २०० मिली व त्यापेक्षा जास्त द्रव धारण क्षमता असलेल्या पीईटी व पीईटीई बाटल्या.
पुनर्चक्रण होणारी शैक्षणिक व कार्यालयीन उपयोगाची प्लास्टीक स्टेशनरी उत्पादने इत्यादी.
अशी होईल शिक्षा
प्लास्टीक व थर्माकोलबंदी अंतर्गत पहिला गुन्हा नोंद झाल्यास ५ हजार रुपये, दुसरा गुन्हा नोंद झाल्यास १० हजार रुपये तर तिसऱ्यांदा गुन्हा नोंद झाल्यास २५ हजार रुपये आणि ३ महिने कारावास अशी दंडात्मक कारवाई केली जाईल.
मुंबई विमानतळावर प्लास्टीक वापर होणार बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरही आजपासून एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टीकचा वापर पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक वातावरणासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.
राज्य सरकारने एकदाच वापरल्या जाणाºया प्लास्टीकचा वापर टाळण्याचे निर्देश जुलै २०१८ मध्येच दिले होते. तेव्हापासून विमानतळावरील हवाई प्रवासाशी संबंधित विविध विभाग, विमान कंपन्या, खासगी कार्यालये यासह सर्वांना अशाप्रकारच्या प्लास्टीकचा वापर टाळण्याबाबत प्रोत्साहित केले जात आहे.
ज्या प्लास्टीकचा पुनर्वापर शक्य आहे त्याचा पुनर्वापर केला जात असून पर्यावरणाला कमीतकमी हानी पोहोचेल अशी काळजी घेण्यात येत आहे. शक्य तिथे कागदापासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर करण्यात येणार असल्याचेही विमानतळ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.