Join us

दादा, एक ट्रिलियन डॉलर म्हणजे एकावर किती शून्य?; बायको, पोरं, शेजारी हिशोब करून परेशान

By अतुल कुलकर्णी | Published: March 13, 2022 6:41 AM

तुम्ही कधी नव्हे ते इंग्रजीत एक ट्रिलियन डॉलर असं थाटात सांगितलं. त्या ऐवजी शुद्ध मराठीत किती लाख रुपये असं सांगितलं असतं तर आमचा वेळ तरी वाचला असता.

- अतुल कुलकर्णी

प्रिय अजित दादा, नमस्कार...

शुक्रवारी आपण राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राची घोडदौड एक ट्रिलियन डॉलरच्या दिशेने जाणार, असं आपण बोललात. तेव्हापासून वेगवेगळी आकडेमोड करून पाहिली. पण एक ट्रिलियन डॉलर म्हणजे एकावर किती शून्य याचा काही थांगपत्ता लागेना...

तुम्ही कधी नव्हे ते इंग्रजीत एक ट्रिलियन डॉलर असं थाटात सांगितलं. त्या ऐवजी शुद्ध मराठीत किती लाख रुपये असं सांगितलं असतं तर आमचा वेळ तरी वाचला असता. देवेंद्र फडणवीसांनी काही वर्षांपूर्वी जलसंपदा विभागात ७० हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. असे किती घोटाळे एकत्र केल्यावर एक ट्रिलियन होतो..? असं सोपं सांगितलं तर पटकन समजलं असतं... दोन दिवसांपासून मी, बायको, पोरं, शेजारी-पाजारी सगळे एक ट्रिलियन म्हणजे किती ह्याचा हिशोब करून परेशान झालोय... 

याच्या आधी एकदा सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर होणार असं सांगितलं होतं... प्रत्येकाने आपलं उत्पन्न दुप्पट केलं की राज्याची अर्थव्यवस्था एका फटक्यात एक ट्रिलियनच्या पुढे जाईल असंही त्यांनी सांगितलं होतं... पण आपणच आपलं उत्पन्न दुप्पट कसं करायचं..? हे काही त्यांनी सांगितलं नव्हतं... त्यांनी जो दावा केला होता तो त्यांनी कदाचित कुठल्यातरी जागतिक कीर्तीच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकात वाचलेला असेल... तुम्ही देखील अशी पुस्तके वाचली का..? नसतील वाचली तर जरूर वाचा... किंवा सुधीरभाऊंकडे क्लास का लावत नाही तुम्ही...? महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर होणार असं ते म्हणाले होते... पण त्याचं पुढं काय झालं माहिती नाही...? भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर आणि महाराष्ट्राची फक्त एकच ट्रिलियन डॉलर...? च्छा... अजिबात जमलं नाही दादा.... तुम्ही दहा ट्रिलियन डॉलर म्हणायला पाहिजे होतं... का नाही म्हणालात..? एकच्या पुढचा शून्य दिसला नाही की काय...? त्या भाजपवाल्यांपेक्षा आपण थोडं तरी पुढे पाहिजे की नको...?

नवीन गुंतवणूक आपल्याकडे करून घेण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या नंबरवर आला म्हणे... महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात देशात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचा २८ टक्के वाटा आहे. भारताचा विकासदर ८.९ टक्के असला तरी महाराष्ट्राचा विकासदर १२ टक्क्यावर गेला आहे... विरोधी पक्षाचे लोक महाविकास आघाडी सरकारला महावसुली सरकार म्हणतात... महावसुली करता करता ही अशी प्रगती कशी केली हे सुद्धा तुमच्या भाषणात सांगितलं असतं तर बरं झालं असतं...

पण काही म्हणा, तुमच्या या घोषणेमुळे आमच्या पुढे काही प्रश्न निर्माण झाले आहेत... त्यांची उत्तरं देता आली तर बघा.... सगळ्यात आधी कशावर किती शून्य येतात ते सांगा... एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होणार म्हणजे मला काय फायदा होणार ते पण सांगा... पालकाची जुडी आणायची म्हणलं तर किमान चाळीस रुपये लागतात... हल्ली कढीपत्तादेखील फुकटात देत नाहीत भाजीवाले...! भाजीपाला स्वस्त होणार का..? लेकरं शाळेत न जाता शाळावाले भरमसाट फी घेतात ते बंद होणार का..? आता तुमच्याकडे एवढे एक ट्रिलियन डॉलर येणार... मग आमच्या पोराबाळांची फी माफ होणार का...? पेट्रोल-डिझेल भरमसाट वाढलं, त्याच्या किमती कमी होणार का..? चारशे रुपये फोनचं बिल भरलं नाही तर लगेच खासगी कंपन्या फोन करून बिल कधी भरणार म्हणून विचारतात..? लाईट बिल भरलं नाही तर लाईट कट करतात..? पण ज्यांनी लाखो रुपये विजेची थकबाकी केली

त्या उद्योजकांचे लाईट कट का होत नाहीत..? एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था झाली की हे सगळे प्रश्न सुटतील का हो दादा...?अजून काही दिवस अधिवेशन आहे. आमच्या ह्या प्रश्नांची उत्तर देता आली तर बघा... नाहीतरी अधिवेशन चालू असलं काय आणि बंद झालं काय... आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात काय फरक पडणार...? सकाळी उठलं की लोकल ट्रेनमध्ये स्वतःला कोंबून घ्यायचं... दिवसभर राबराब राबायचं, रात्री त्याच लोकलमध्ये स्वतःला कोंबून घेत घरी जायचं... आणि सुधीरभाऊंनी सांगितल्याप्रमाणे स्वतःचे उत्पन्न दुप्पट कधी होईल याची स्वप्न पाहत झोपी जायचं... यात कधी फरक पडणार का..? एवढंच सांगता आलं तर बघा...आपलाच, बाबूराव

टॅग्स :अजित पवारअर्थसंकल्पीय अधिवेशनमहाराष्ट्र विकास आघाडी