वन, टू बीएचके घरांनाच मुंबईत सर्वाधिक पसंती; मागणीत घट, पुरवठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 07:04 AM2023-04-07T07:04:13+5:302023-04-07T07:04:29+5:30
जाणून घ्या महामुंबईत काय आहे स्थिती?
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: चालू वर्षात मुंबईच्या घरविक्रीमध्ये किरकोळ स्वरूपाची घट झाली असली तरी आजही मुंबईकर ग्राहक प्रामुख्याने वन-बीएचके आणि टू-बीएचके घरांनाच पसंती देत असल्याची माहिती मॅजिक बिक्स या बांधकाम क्षेत्राशी निगडित अग्रगण्य कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे.
कंपनीच्या सर्वेक्षणाद्वारे घर खरेदीस इच्छुक ग्राहकांचा कल कोणत्या दिशेने आहे, याची माहिती उपलब्ध झाली आहे. आजच्या घडीला मोठ्या घरांपेक्षा वन अथवा टू बीएचके घरे ही तुलनेने परवडणारी मानली जातात. सरत्या तीन महिन्यांमध्ये मुंबई व उपनगरांमध्ये ज्या घरांची विक्री झाली त्यामध्ये सर्वाधिक ७५ टक्के घरे ही वन-बीएचके होती. तसेच ग्राहकांनी घर खरेदी करताना ज्या प्रकल्पांत घरे तयार आहेत अशा ‘रेडी पझेशन’ घरांना पसंती देत असल्याचेही दिसून आले. पश्चिम उपनगरात आता मेट्रोचे जाळे कार्यरत झाल्याच्या पार्श्वभूमीवर मालाड व कांदिवली या दोन उपनगरांना सर्वाधिक मागणी असल्याचेही दिसून आले.
महामुंबईत काय आहे स्थिती?
- चालू वर्षातील जानेवारी ते मार्च अशा तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये मुंबई व उपनगरात घरांच्या मागणीत किरकोळ अशी २.४ टक्क्यांची घट नोंदली गेली आहे. तर पुरवठ्यामध्ये ०.८ टक्के वाढ झाली आहे.
- ठाण्यामध्ये निवासी मालमत्ताच्या मागणीमध्ये मागील तिमाहीच्या तुलनेत यंदा ६.८ टक्के वाढ नोंदली गेली आहे.
- नवी मुंबईमध्ये मागील तिमाहीच्या तुलनेत ०.५ टक्के वाढ दिसून आली. तिथे टू बीएचके घरांना सर्वाधिक मागणी असून विक्री झालेल्या एकूण घरांपैकी ५२ टक्के वाटा हा टू बीएचके घरांचा आहे.
- ग्राहकांनी प्रामुख्याने पनवेल, खारघर आणि ऐरोली या उपनगरांना पसंती दिल्याचे दिसून येते.