मुंबई - शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला होता. तसेच, मुख्यमंत्र्यांनी माझ्यासोबत यावं आणि फेस टू फेस चर्चा करावी असं चॅलेंजही त्यांनी दिलं होतं. एका कार्यक्रमातील मुलाखतीत आदित्य यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराची आरोप करत हे सरकार १०० टक्के भ्रष्टाचारी असल्याचंही म्हटलं होतं. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंना चॅलेंज दिलं आहे. तुम्ही चर्चेला या, तुमच्या कमाईचा स्त्रोत आणि माझ्या कमाईचा स्त्रोत यावर खुली चर्चा करू, असे चॅलेंजच श्रीकांत शिंदेनी आदित्य ठाकरेंना दिलंय.
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यावर, खासदार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. जेलचं कोणाला सांगता, कंपनी स्थापन होण्याअगोदर तुम्ही टेंडर दिले आहेत. हे सगळे काळे कागद कोणाचे आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात कोणाला जेलमध्ये जावे लागेल, असे म्हणत श्रीकांत शिंदेंनी नाव न घेता आदित्य ठाकरेंवर टीका केली.
मुख्यमंत्र्यांनी पक्षासाठी काठ्या खाल्ल्या आहेत, गुन्हे दाखल करुन घेतले आहेत. तुम्ही काय केलं?. तुम्ही सभा घेण्यासाठी कुठं जायचा तेव्हा तुमचा फूड ट्रँक तुमच्यासोबत असायचा. जर काही मिळालं नाही, तर आम्ही आणायला जायचो. ह्यांना सँडविच लागायचा, स्पिंगला लागायचा. तेव्हा आम्ही नांदेडला असलो तर एकजण संभाजीनगरला जायचा, एकाला हैदराबादला पाठवायचं. त्यांना कोल्ड कॉफी आवडायची, म्हणून आम्ही त्यांच्या गाडीमध्ये कोल्ड कॉफी ठेवायचो, सँडविच ठेवायचो, असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली.
आपण दोघं चर्चा करू
तुम्हाला डिबेट करायचंय ना, चला आपण दोघे चर्चा करू. आमचा सोर्स ऑफ इन्कम काय, तुमचा सोर्स ऑफ इन्कम काय आहे, हे लोकांसमोर ठेवा. शिवसैनिकांना कळू द्या, असे म्हणत श्रीकांत शिंदेंनीच आदित्य ठाकरेंना चॅलेंज दिलंय. तसेच, कोविड काळात केलेला भ्रष्टाचार, बीएमसीमध्ये केलेला भ्रष्टाचार आता समोर येतोय. जेलमध्ये जाण्याच्या भीतीनेच हे मोदींचे पाय धरायला गेले होते, असा गौप्यस्फोटही श्रीकांत शिंदेंनी केला.
आदित्य ठाकरेंनी दिलं होतं चॅलेंज
इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचं सेशन एकापाठोपाठ एक होतं. त्याऐवजी, एकत्र सेशन करू. मी एकटा बसतो, त्यांच्या बाजूने येतील तेवढे येऊ द्या, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदेंना दिलं होतं. पण, एकनाथ शिंदे आलेच नाहीत. आदित्य ठाकरे यांचं सेशन संपायला आलं तेव्हा निवेदिकेनं सांगितलं की, एकनाथ शिंदेंना अचानक दिल्लीला जावं लागत असल्याने ते येऊ शकत नाहीत. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी आरोप केला होता की, ते सकाळी उठतच नाहीत आणि त्यांच्यामुळे माझ्या दोन फ्लाईट मिस झाल्या होत्या