- मनोहर कुंभेजकर मुंबई : कोरोनाच्या महामारीचे संकट लक्षात घेता, के पश्चिम वॉर्डचे साहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी या वॉर्डमध्ये ‘एक प्रभाग एक गणपती’ संकल्पना राबविण्याचे आवाहन येथील १५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले होते. ही संकल्पना राबविणे शक्य नसल्याची भूमिका येथील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
‘अंधेरीचा राजा’ अशी ख्याती असलेल्या आझाद नगर उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक व पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर(शैलेश) फणसे म्हणाले, साहाय्यक आयुक्त मोटे यांनी येथील सुमारे १५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जरी एक प्रभाग एक गणपती संकल्पना राबविण्याची विनंती केली असली तरी, आता उशीर झाला असून येथील सार्वजनिक मंडळांनी आधीपासूनच गणपतीची तयारी सुरू केली आहे. उलट एक प्रभाग एक गणपती संकल्पना राबविल्यास गणेशभक्तांची जास्त गर्दी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार आम्ही शासनाच्या नियमांचे पालन करून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार आहोत, अशी माहिती शैलेश फणसे यांनी दिली. वर्सोवा, मॉडेल टाऊन येथील वर्सोवा मेट्रो स्टेशनसमोर बसणाऱ्या स्वप्नाक्षय मित्र मंडळाचे यंदा ४० वे वर्ष आहे. या मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक व माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र(बाळा) आंबेरकर यांनी सांगितले की, मोटे यांची संकल्पना चांगली असली तरी ती राबविणे शक्य नाही. आम्हीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार असून शासनाच्या नियमांचे पालन करीत ४ फुटांचा गणपती बसविणार आहोत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर, दहिसर पश्चिम या मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे म्हणाले की, येत्या रविवारी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक होणार असून यामध्ये साधेपणाने गणेशोत्सवकसा साजरा करायचा यावर निर्णय होईल.
के /पश्चिम साहाय्यक आयुक्त मोटे यांनी ‘एक प्रभाग एक गणपती’ असा फतवा काढला तो साफ चुकीचा असून हिंदू उत्सवावर गदा आणण्याचा प्रकार आहे, असे मत वांद्रे पश्चिम येथील शिवसेनेचे उपविभागप्रमुख जितेंद्र जानावळे यांनी व्यक्त केले.हा फतवा येथील गणेशोत्सव मंडळे मान्य करणार नसून प्रभागातील सर्व गणेश मंडळे सरकारी नियमांचे पालन करून ‘मंडळ तिथे गणपती’ संकल्पना राबवूनच गणेशोत्सव साजरा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यशोधर(शैलेश) फणसे म्हणाले, साहाय्यक आयुक्त मोटे यांनी येथील सुमारे १५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जरी एक प्रभाग एक गणपती संकल्पना राबविण्याची विनंती केली असली तरी, आता उशीर झाला असून येथील सार्वजनिक मंडळांनी आधीपासूनच गणपतीची तयारी सुरू केली़