गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी एक खिडकी कार्यपध्दती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:06 AM2021-07-16T04:06:12+5:302021-07-16T04:06:12+5:30
मुंबई : मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळांना अर्ज भरण्याची एक खिडकी कार्यपध्दती १४ जुलैपासून उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी २१ ...
मुंबई : मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळांना अर्ज भरण्याची एक खिडकी कार्यपध्दती १४ जुलैपासून उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी २१ जुलैपर्यंत सॅप प्रणाली बंद असल्याने मंडळांना २१ जुलैपर्यंत संबंधित विभाग कार्यालयात ऑफलाईन पध्दतीने अर्ज करता येतील. २२ जुलैनंतर सॅप सुरु होणार असल्याने मंडळांना संगणकीय एक खिडकी पध्दतीने अर्ज करता येईल, असेही पालिकेकडून सांगण्यात आले.
दि. २१ जुलैपर्यंत मंडळांचे ऑफलाईन पध्दतीने विभाग कार्यालयात स्वीकारलेले अर्ज सॅप प्रणालीत संबंधित विभाग कार्यालयामार्फत समाविष्ट केले जातील. त्यामुळे मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दल यांच्याकडे परवानगीची गरज नाही. विशेषत: कोरोनामुळे मंडळांकडून यासाठीचे शुल्क आकारण्यात येणार नाही. शिवाय कमी असलेला वेळ लक्षात घेता, ज्या मंडळांना मागील वर्षी परवानगी दिली होती, त्या मंडळाचे अर्ज यावर्षी ऑनलाईन पध्दतीने स्थानिक पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस शाखेकडे न पाठवता मागील वर्षीच्या परवानगीच्या आधारे त्वरित परवानगी देण्यात येईल. मात्र, त्यासाठी मागील वर्षी परवानगी दिलेल्या परवानगीचा क्रमांक अर्जामध्ये न चुकता नमूद करणे आवश्यक राहील.
दि. २१ जुलैपर्यंत अर्जदार संबंधित विभाग कार्यालयात अर्ज सादर करू शकतात. दि. २२ जुलैपासून अर्ज स्वीकारण्याची संगणकीय प्रणाली सुरु झाल्यानंतर अर्जदार दिलेल्या कालावधीत कुठूनही, कधीही अर्ज करू शकतात. याबाबतची ऑनलाईन सुविधा महापालिकेच्या संकेतस्थळावर मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. ऑनलाईन पध्दतीने मंडळांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ सप्टेंबरच्या सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे. कोणतीही अडचण आल्यास संबंधित सहाय्यक आयुक्तांची मदत घ्यावी, असे पालिकेने म्हटले आहे.
दरम्यान, कोरोनामुळे आवश्यक बाबींचे विशेष हमीपत्र मंडळांना देणे बंधनकारक आहे. ऑनलाईन प्रणालीतून हे हमीपत्र डाऊनलोड करता येईल. त्यावर संबंधितांच्या स्वाक्षऱ्या करून अपलोड करावे. अर्जासह सादर करावे.