दहिसरमध्ये कामगारांचे एक ‘गिरणगाव’

By admin | Published: June 15, 2017 03:22 AM2017-06-15T03:22:56+5:302017-06-15T03:22:56+5:30

मुंबई शहर आणि उपनगरातील गिरण्या बंद पडल्या आणि मुंबईचा वैभव असलेला गिरणी कामगार शहराबाहेर फेकला गेला. काहींनी गावाकडची वाट धरली तर काहींनी

One of the workers 'Girangaon' in Dahisar | दहिसरमध्ये कामगारांचे एक ‘गिरणगाव’

दहिसरमध्ये कामगारांचे एक ‘गिरणगाव’

Next

सागर नेवरेकर । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील गिरण्या बंद पडल्या आणि मुंबईचा वैभव असलेला गिरणी कामगार शहराबाहेर फेकला गेला. काहींनी गावाकडची वाट धरली तर काहींनी येथे रोजगार मिळविला. यातच डोक्यावरचे छप्पर मिळविणे किंवा ते टिकविणे अवघडच होते. मात्र यावरही मात करत दहिसर येथे उभ्या राहिलेल्या गिरणी कामगारांच्या वसाहतीमध्ये गिरणी कामगारांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. सर्वधर्म समभाव टिकवत ‘मराठमोळी’ संस्कृती जपणाऱ्या गिरणी कामगारांनी दहिसरमध्येच ‘गिरणगाव’ उभे केले आहे.
दहिसर रेल्वे स्थानक आणि दहिसर चेकनाका यांच्या मधोमध १५ मिनिटांवर वसलेली गिरणी कामगारांची वसाहत राष्ट्रीय मजदूर आनंद नगर को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीज असोसिएशन लिमिटेड या नावाने ओळखली जाते. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील एक सहकारी मंत्री वसंतराव होशिंग, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे संचालक वि. बा. आरोलकर, भाई भोसले यांच्या प्रयत्नाने ही वसाहत उभी राहिली.
२३ नोव्हेंबर १९८३ रोजी गिरणी कामगार येथील इमारतीमध्ये वास्तव्यास येऊ लागला. आजमितीस सोसायटीच्या ८ इमारतींमध्ये ३१२ घरे आणि २६ दुकाने आहेत. इमारत चार मजली असून, येथे पार्किंगची व्यवस्था आहे. ८ सोसायट्यांमध्ये ४० सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षेसाठी तैनात आहेत. सर्वधर्मीय बांधव येथे राहतात. गिरणी कामगारांच्या उत्सवप्रिय स्वभावामुळे सोसायटीमध्ये मध्यवर्ती समितीच्या सहकार्याने होळी, गणेशोत्सव, नवरात्री, तुलसी विवाह, कोजागिरी पौर्णिमा, ख्रिसमस आणि सत्यनारायणाची पूजा असे सर्व सण-उत्सव साजरे केले जातात. त्यानिमित्ताने लहान मुले, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन आणि शालेय साहित्य वितरण असे उपक्रम येथे राबविले जातात.
सोसायटीमध्ये उत्सव आणि लोकोपयोगी उपक्रमांसोबतच बागेचे पुनर्जीवन सुंदररीत्या करण्यात आले आहे. सोसायटीत सुंदर बाग असून, लहान मुलांना खेळण्यासाठी मनोरंजनाची साधने आहेत. स्वच्छता अभियानामध्ये सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा ठेवला जातो. कचऱ्याचे विघटन केले जाते. ओल्या कचऱ्यापासून कम्पोस्ट खत तयार करून बागेच्या झाडांना घातले जाते. विशेष म्हणजे गांडूळखत प्रकल्प सोसायटीमध्ये राबवला जात आहे. सोसायटीत नारळ, सुपारी, औषधी वनस्पती आणि फुलझाडे लावून परिसराची शोभा वाढविण्यात आली आहे. जवळजवळ सत्तर नारळाची झाडे वसाहतीमध्ये आहेत.
पाणीबचतीसाठी सोसायटीचे सर्व सभासद नेहमी दक्ष असतात. पाण्याचा अपव्यय केला जात नाही. महापालिकेचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. तसेच बागेसाठी, गाडी धुण्यासाठी आणि इतर कामांसाठी सोसायटीमधील विहिरीच्या पाण्याचा वापर केला जातो. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचे काम येथे सुरू आहे. त्यामुळे ही सोसायटी टँकरमुक्त आहे, असे सोसायटीतले रहिवासी सांगतात. शिवाय ग्रंथालय आणि व्यायामशाळाही येथे बांधण्यात येणार आहे.
सोसायटीमध्ये वाद निर्माण झाल्यास समिती तो सामोपचाराने सोडवते. समितीमध्ये एकूण ३२ सभासद असून, ही सोसायटी पूर्णपणे तंटामुक्त आहे

मानवी अभिहस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करा
मुंबई शहर आणि उपनगरातील इमारतींमधील सोसायट्यांनी मानवी अभिहस्तांतरण प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे ही प्रक्रिया राष्ट्रीय मजदूर आनंद नगर सोसायटीने अगदी कमी खर्चात पूर्ण केली आहे. परिणामी, मुंबईतील उर्वरित सोसायट्यांनीही ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सोसायटीने केले आहे.

- रमेश प्रभू अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे सदस्यत्व राष्ट्रीय मजदूर आनंद नगर को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीज असोसिएशन लिमिटेडकडे आहे.

सहभागासाठी आवाहन
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘आमची सोसायटी, आमचं कुटुंब’ या उपक्रमात आपल्या गृहनिर्माण संस्थेला सहभागी व्हायचे असल्यास आपण ’lokmat.mahasewa@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधू शकता.

Web Title: One of the workers 'Girangaon' in Dahisar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.