एक साल...मोदी सरकार
By admin | Published: May 25, 2015 10:46 PM2015-05-25T22:46:05+5:302015-05-25T22:46:05+5:30
मोदी सरकारने आपल्या एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने देशात विविध ठिकाणी सभा आयोजित करून आपला वर्षभराचा लेखाजोखा मोदी सरकार जनतेसमोर मांडणार आहे.
नुकताच २५ मे २०१५ रोजी मोदी सरकारने आपल्या एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने देशात विविध ठिकाणी सभा आयोजित करून आपला वर्षभराचा लेखाजोखा मोदी सरकार जनतेसमोर मांडणार आहे. देशातील मतदारांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवल्यामुळे देशात मोदी नावाची त्सुनामी आली होती. त्या त्सुनामीमध्ये देशातील दिग्गज नेते पराभूत झाले. भाजपाला एकहाती सत्ता मिळाली. सत्त्तेची नुकतीच वर्षपूर्ती झाली मात्र देशातील नागरिक अजूनही अच्छे दिनच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे महत्त्वाचे प्रश्न अजूनही सुटले नाहीत. महागाईचा चढता आलेख देशातील नागरिकांची चिंता वाढवत आहे. भूमी अधिग्रहण कायद्यामुळे मोदी सरकार शेतकऱ्यांविरोधी असल्याचा आरोप देखील करण्यात आला. मेक इन इंडियाचा नारा, शेजारी देशासह अमेरिका, चीन, नेपाळ, आॅस्ट्रेलिया आदी ठिकाणचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दौरे प्रचंड गाजले. अनिवासी भारतीयांशी मोदींनी साधलेला संवाद यासारख्या घडामोडी एक वर्षात महत्त्वाच्या ठरल्या, मात्र विविध प्रकारची दिलेली आश्वासने, काळ्या पैशाचा मुद्दा यामुळे मोदी सरकार सध्या बॅकफूटवर गेले आहे. देशातील अनेक नागरिक मोदी सरकारवर सडेतोड टीका करीत आहेत. काही नागरिकांनी भारताच्या वाढत्या प्रगतीमुळे यामागे मोदी सरकारचे यश असल्याचे मान्य केले आहे.
अब की बार मोदी सरकार म्हणत आपल्या कामाचा श्रीगणेशा केलेल्या सरकारने आता वर्षपूर्ती केली आहे. पण या वर्षभरात त्यांनी नागरिकांच्या मनात आपली जागा कशाप्रकारे निर्माण केली हे जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. स्वच्छ भारत अभियान हे गेल्या वर्षभरात संपूर्ण देशभरात राबविले जात आहे. स्वच्छता अभियानाव्यतिरिक्त इतरही काही महत्त्वाच्या समस्या असून त्या कायम असल्याने नागरिकांमध्ये निराशा पहायला मिळते. तरुणांसाठी नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध करून देणार असे आश्वासन मोदींनी दिले होते. परंतु आजही तरुण बेरोजगार आहेत आणि त्यातील कित्येक तरुण हे सुशिक्षित बेरोजगार आहेत.
मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त लोकमतच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधण्यात आला. ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविणाऱ्या मोदी सरकारच्या कामकाजाबद्दल ते समाधानी आहेत का? याबाबत काही निवडक तरु णांच्या प्रतिक्रि या घेतल्या आणि त्यांचे याविषयीचे मत जाणून घेतले.
देशात मोदी लाट
मोदी सरकारचे वर्षभरातील काम पाहता थोडी खुशी, थोडा गम असेच काहीसे आहे. काही बाबतीत त्यांनी आपली बाजू कणखरपणे मांडली आहे तर काही ठिकाणी मात्र या सरकारकडून निराशाच पदरी पडली. या संपूर्ण वर्षात मोदींची लाट पहायला मिळाली. जिकडे तिकडे मोदी अगदी कपड्यांची स्टाईल यामध्ये मोदी नावाची फॅशन पहायला मिळाली. मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत हीच अपेक्षा आहे.
- प्रियंका पोखरकर, कोपरखैरणे.
बुरे दिन अजूनही कायम
अब की बार मोदी सरकार... अच्छे दिन आयेंगे... या सर्वांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूकच झाली. महागाईचा चढता आलेख पाहिला तर त्यात फारसा बदल झाला नाही. उलट वर्षभरात सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागला. मोदी सरकारने कित्येक आश्वासने दिली मात्र त्यातली मोजकीच अश्वासने पूर्ण करण्यात त्यांना यश मिळाले आहे असे चित्र स्पष्ट दिसते. आता पुढील वर्षात आणखी काय पदरी पडणार आहे याचे उत्तर मोदी सरकारच देऊ शकतील
- अक्षता ठाकरे, सीबीडी.
यापूर्वी सत्तेत असणाऱ्या काँग्रेस सरकारने देखील जनतेचा अपेक्षाभंग केला असल्यामुळे जनतेने भाजपा सरकारला संधी दिली. अवघ्या एका वर्षात सरकारची परीक्षा घेणे योग्य नव्हे त्यासाठी थोडा कालावधी वाट पाहणे देखील गरजेचे आहे. मोदींच्या कार्यकाळात जगभरात भारत देशाला नवीन ओळख मिळाली आहे. अनेक देश भारतामध्ये उद्योगधंदे उभारण्यासाठी उत्सुक आहेत त्यामुळे याठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
- युवराज(बापू) पाटील, खारघर
स्वच्छता अभियानाचा फायदा
देशभरात राबविलेले स्वच्छ भारत अभियान स्तुत्य आहे. या अभियानामुळे नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटले आणि त्यामुळे रोगराईपासून बचावही होत आहे. मोदींच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाला भारताबरोबरच इतर देशातूनही कौतुकाची थाप मिळत आहे. भारताला मिळालेल्या या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वामुळे आज देशाची प्रगती होत आहे आणि अशीच कायम होईल असे आम्हा तरुणांना वाटते
- चिराग सावंत, बेलापूर.
अच्छे दिनचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने अजूनपर्यंत आपले आश्वासन पाळले नसल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. अच्छे दिन तर सोडा देशातील नागरिकांना बुरे दिन पहावयास मिळत आहेत. मोदी सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी साधे प्रयत्नही होत नसल्याचे दिसत आहे. महागाईवर सरकारचे नियंत्रण सुटल्याने देशात मोदी सरकारच्या विरोधात लाट उसळली आहे. ती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने दिलेली आश्वासने पाळावीत, नाही तर जनता त्यांना धडा शिकवेल.
- अभिमन्यू तोडेकर, कोपरा गाव, खारघर