मुंबई : तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने पी-३०५ बार्ज (तराफा) आणि वरप्रदा बोटीवरील बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या सुटकेच्या आशा आता मंदावल्या आहेत. भारतीय नौदलासह संबंधित यंत्रणांकडून शोध आणि बचावमोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत एकूण ६० मृतदेह सापडले असून अद्याप २६ कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे.
तौक्तेच्या तडाख्याने पी -३०५ या तराफ्याला जलसमाधी मिळाली. त्यावरील २६१ कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी नौदल, तटरक्षक दलासह तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) ने शोध आणि बचावकार्य चालू ठेवले आहे. शुक्रवारी आणखी दोन मृतदेह हाती लागल्याचे नौदलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आतापर्यंत एकूण ५१ मृतदेह हाती लागले आहेत. तर, अजूनही ३५ जण बेपत्ता आहेत. नौदलाच्या पथकांनी पी - ३०५ वरील १८६ आणि वरप्रदा बोटीवरील दोघांची अशा एकूण १८८ लोकांची सुटका केली आहे. दरम्यान, वरप्रदा बोटीवरील १३ पैकी दोघांचीच सुटका झाली आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचा शोध तटरक्षक दलाच्या नेतृत्वात घेतला जात आहे.
दरम्यान, उत्खननासाठी वापरली जाणारी सागरभूषण आणि एस.एस.-३ या बोटी किनाऱ्यावर वाहून आणण्यात आल्या आहेत. एस.एस.-३ इंदिरा डाॅकवर नांगरली असून सागरभूषण शुक्रवारी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये आणण्यात आली. अद्याप २६ बेपत्ता आहेत, तर ६० मृतदेह हाती लागले.
मृतांच्या नातेवाइकांची अस्लम शेख यांनी घेतली भेटओएनजीसी बार्ज पी ३०५ दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांची राज्याचे बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी जे.जे. रुग्णालयात जाऊन भेट घेतली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत जाहीर करण्याचे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले. ही घटना महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घडली. मृतांच्या नातेवाईकांना मृतदेह मिळविण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी आपण जे. जे. प्रशासन तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.