लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नौदलाची शोधमोहीम अद्याप सुरू आहे. चक्रीवादळाला चार दिवस उलटल्यानंतर आता तेल आणि नैसर्गिक वायू मंडळ (ओएनजीसी) आणि अफ्काॅन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून अर्थसाहाय्याची घोषणा करण्यात आली. ओएनजीसीने मृतांच्या नातेवाइकांसाठी दोन लाख, तर वाचलेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येकी एक लाखाची तातडीची मदत जाहीर केली आहे.
ओनजीसीने शुक्रवारी जारी केलेल्या पत्रकानुसार या चक्रीवादळामुळे संकटात सापडलेल्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्यासाठी ओएनजीसी आणि अफ्काॅन्स कंपनीकडून योजना आखण्याचे काम सुरू आहे. तोपर्यंत तातडीची मदत म्हणून मृतांच्या नातेवाइकांना दोन लाख, तर वाचलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाखांची मदत महामंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. तर, अफ्काॅन्सने आपल्या आणि उपकंत्राटदार कंपनीच्या मृत कर्मचाऱ्यांसाठी योजना आखण्यात येत असल्याचे सांगितले.
मृत कर्मचाऱ्याचा उर्वरित सेवाकाळ किंवा जास्तीत जास्त दहा वर्षांपर्यंतचा पगार, विम्याची रक्कम, सानुग्रह अनुदान अशी मदत केली जाणार आहे. या मदतीचे स्वरूप आणि नियमावली निश्चित करण्याचे काम सुरू आहे. लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल. साधारणपणे प्रत्येक मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना यातून ३५ ते ७५ लाखांपर्यंतचा निधी उपलब्ध होणार असल्याचे अफ्काॅन्सने म्हटले आहे. तसेच, मृत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा शैक्षणिक खर्च उचलण्याकरिता ट्रस्टची स्थापना केली जाणार आहे. शिष्यवृत्तीच्या स्वरूपात पाल्यांचा शैक्षणिक खर्च उचलला जाईल, असे अफ्काॅन्सने म्हटले आहे.
..............................................