...अखेर रखडलेले विद्युतीकरणाचे काम सुरू
By admin | Published: April 9, 2015 11:14 PM2015-04-09T23:14:51+5:302015-04-09T23:14:51+5:30
लोकमतने वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे संबंधित ठेकेदाराने हेदुटणे वाडी विद्युतीकरणाचे रखडलेले काम गुरुवारपासून सुरू केले. खांबावर तारा
पनवेल : लोकमतने वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे संबंधित ठेकेदाराने हेदुटणे वाडी विद्युतीकरणाचे रखडलेले काम गुरुवारपासून सुरू केले. खांबावर तारा टाकण्याकरिता मोठा फौजफाटा वाडीत सकाळीच धडकला. त्यामुळे येथील आदिवासींनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र वीज नसतानाही बिले कशी पाठवली, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
हेदुटणे या आदिवासी वाडीवर स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्षे उलटली तरी वीज पोहचली नाही. याकरिता वारंवार मागणी व पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा सुधारणा योजनेतून येथे वीज पोहचविण्याचा एकूण ३५ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्याला त्वरित मंजुरीही मिळाली व चार महिन्यांपूर्वी ठेकेदार नियुक्त करून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली, मात्र ती फक्त नावापुरती. चार महिने उलटूनही येथील दिवे पेटलेले नाहीत. फक्त येथील आदिवासींना मीटर देण्याची घाई महावितरणने केली. या कामाचा ठेका दिलेला ठेकेदार काम पूर्ण करण्यास टाळाटाळ करीत होता. त्याचबरोबर महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता आम्हाला इतकेच काम आहे का? अशी उत्तरे दिली जात असल्याने येथील आदिवासी त्रस्त होते.
आपल्या घरातील अंधार मिटणार म्हणून हेदुटणे वाडीतील लोकांना खांब बसविण्याचे काम करीत ठेकेदाराला सहकार्य केले, तरीही त्यांची दया ना ठेकेदाराला आली ना महावितरणला. उलट गेल्या महिन्यात तर महावितरणने या सर्वांना वीज बिले पाठवली. त्यामध्ये रीडिंगही दाखविण्यात आले. या संदर्भात लोकमतने विजेअगोदर बिले पोहोचली, या आशयाखाली गुरुवारी वृत्त प्रसिद्ध करीत महावितरणचा आंधळा कारभार चव्हाट्यावर आणला. त्याची दखल घेत महावितरणने त्या ठेकेदाराला कामाला लावले आणि प्रत्यक्षात रखडलेल्या कामाला सुरुवात झाली.