ठाणे : श्रावण महिना आणि त्यानंतर येणा-या गणेशोत्सवात कांदा व लसूण खाणे काही जण वर्ज्य मानत असल्याने या काळात त्यांची मागणी कमी झालेली असते. असे असले तरी गौरीपूजनानंतर कांदा व लसूण यांची आवक वाढल्याने अन् पावसामुळे त्यांचे भाव खाली घसरले आहेत. कमी झालेल्या किमतीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवानंतर आता कांदा, लसूण यांची मागणी वाढली आहे. गणेशोत्सवात कांदा-बटाट्याचा भाव स्थिर होता. गौरीपूजनानंतर तो खाली घसरल्याने बाप्पाने व्यापाऱ्यांची निराशा केली. पावसाच्या फटक्यानेही कांद्याने व्यापाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. परंतु, ग्राहकांना मात्र त्यामुळे दिलासा मिळाला आहे. ३४ एकर जागेवर बसलेल्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिकहून बहुतांश कांदा-लसूण येतो. बाजारपेठेत कांदा-बटाटा आणि लसूण मिळून दररोज १०० टन माल बाजारात विक्रीस येत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती भरत गोंधळे यांनी दिली. गणेशोत्सवात बाजार स्थिर असला तरी त्यानंतर तो एकदम नरमच पडला. कारण, त्याला पावसाचा फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. बाजार समितीतील व्यापारी मोहन नाईक यांनी सांगितले की, कांदा हा नाशवंत असल्याने त्याची व्यापाऱ्यांना साठवणूक करता येत नाही. अनेक ठिकाणी पावसामुळे कांदा भिजल्याने घेतलेला मालसुद्धा फेकून देण्याची वेळ आली. बाजारात शेतकऱ्यांचा माल जास्त आला की, बाजार घटतो. नाफेडतर्फे सरकारकडून कांदाच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, सरकारचे ते प्रयत्न असफल झाले. व्यापारी शंकर आव्हाड यांनी सांगितले की, कांदा-बटाट्याच्या दर कमी होण्याचे कारण सरकारने बाहेरच्या देशातून कांदा आयात केला होता. नाशिक बाजारपेठेतील कांदा हा पावसामुळे सडला आहे. भिजलेल्या मालाला उठाव नाही. काही शेतकऱ्यांनी कांदा साठवून तो उत्सवादरम्यान विक्रीसाठी आणला तर त्याला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा केली होती. परंतु, त्यांच्या अपेक्षेवर पावसाने पाणी फेरले. बाजार समितीचे सदस्य कपिल थळे यांनी सांगितले, एक हेक्टरमधील कांदा उत्पन्नावर ३० हजार रुपये खर्च होतो. त्यातून शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल, असे अपेक्षित असते. ३० हजार उत्पादन खर्च आणि विक्रीतून ही ३० हजार रुपयेच मिळत असतील तर त्यांच्या हाती काही येत नाही. केवळ उत्पादन खर्च मिळाल्याने त्यांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत जातो. (प्रतिनिधी)
कांदा-बटाटा, लसणाचे भाव घसरले
By admin | Published: September 10, 2014 11:53 PM