लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऐन सणासुदीच्या काळात भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. यामुळे भाजीपाला खरेदी करताना सामान्य माणसाचा खिसा रिकामा होत आहे. मात्र, अनेक शहरांमध्ये भाजीपाल्यांचे दर हे होलसेल बाजारात कमी व किरकोळ बाजारात जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी होलसेल दराच्या दुप्पट किमतीत भाजीपाला विकला जात आहे. यामुळे सामान्य माणसाला भाजीपाल्याची नेमकी किंमत समजण्यास अडचण होत आहे.
होलसेल बाजारात कमी दरात भाजी मिळत असल्यामुळे अनेक जण सकाळच्या वेळेस तेथे गर्दी करताना दिसून येत आहेत. यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. कोरोनाच्या काळात इंधनासोबतच खाद्यपदार्थांचे भाव वाढल्याने सामान्य माणसाला मोठा त्रास सहन करावा लागला. गेल्या काही दिवसांमध्ये कडधान्य, डाळी, खाद्यतेल, सिलिंडर पेट्रोल व डिझेल यांचे भाव गगनाला भिडले आहेत. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यातच महागाईचा भडका उडाल्याने आता नेमके जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उपस्थित होत आहे.
हा बघा दरांमधील फरक (प्रतिकिलो दर)
भाजीपाला दादर भायखळा घराजवळ
बटाटा २० २५
कांदा १५ ३०
टोमॅटो २० २५
काकडी २० ३०
कोथिंबीर १० १५
पालक ५ १०
मेथी १० १५
दोडके २० ३०
लिंबू १ २ रु. नग
गवार २५ ४०
पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हातात !
व्यापारी शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करून तो विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र, ज्या दराने तो भाजीपाला शहरांमध्ये विकला जातो त्यातील पैसे शेतकऱ्याचे वाट्याला कमी व दलाल आणि व्यापाऱ्यांच्या वाट्याला जास्त जातात. यामुळे मुंबईत अनेकदा शेतकरी थेट आपल्या शेतातील भाजीपाला विकण्यासाठी घेऊन येतो. मात्र, काहीवेळा या शेतकऱ्यांना पालिका व पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते.
---------------
एवढा फरक कसा?
व्यापारी व दलाल शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करतात. हा भाजीपाला होलसेल मार्केटला विक्रीसाठी आणल्यानंतर शहरातील इतर परिसरातील विक्रेते त्या भाज्या ५ ते ५० किलो तसेच हिरव्या भाज्यांच्या जुड्या असल्यास त्या ५०-१०० अशा एकत्रितरित्या खरेदी करतात. त्यामुळे भाव कमी घेतला जातो. त्यात मेहनत वाचते आणि कमी वेळात जास्त कमाई होते.
- वसंत चिकणे, भाजीविक्रेते
होलसेल बाजारात जाणे परवडत नाही !
कोरोनाच्या काळात पगार निम्मा झाला आहे. परंतु महागाई मात्र वाढत चालली आहे. यासाठी घरात खाण्या - पिण्यातील गोष्टींवर काटकसर केली जात आहे. भाजी स्वस्त मिळते म्हणून होलसेल मार्केटमध्ये ती विकत घ्यायला प्रवासावर अधिक खर्च करावा लागतो.
- सुष्मा तांबे, गृहिणी
होलसेल बाजारात अर्धा आणि पाव किलो भाजी खरेदी केल्यास स्वस्तात मिळत नाही. वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. त्यापेक्षा घराजवळच्या बाजारात भाजी खरेदी करणे अधिक चांगले आहे.
- अंजली पवार, गृहिणी