Join us

लॉकडाऊनमध्ये कांद्याची २०० कोटींची निर्यात, एप्रिलमध्ये दीड लाख टन शेतमाल निर्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 5:31 AM

राज्य शासनाच्या कृषी पणन मंडळाने स्थापन केलेल्या शेतीमाल निर्यात सनियंत्रण कक्षाच्या समन्वयामुळे निर्यात सुरळीत राहण्यास मदत झाली आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभर सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झाले असताना लॉकडाउनच्या काळात एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातून तब्बल २०० कोटी रुपयांच्या कांद्याची निर्यात झाली. राज्य शासनाच्या कृषी पणन मंडळाने स्थापन केलेल्या शेतीमाल निर्यात सनियंत्रण कक्षाच्या समन्वयामुळे निर्यात सुरळीत राहण्यास मदत झाली आहे.निकषांची पुर्तता करण्यास निर्यातदारांना मदत करण्यासाठी पणन मंत्रालयाने ३१ मार्चला बैठक घेऊन शेतीमाल निर्यात सनियंत्रण कक्ष स्थापन केला. त्यामुळे १ ते २७ एप्रिलदरम्यान राज्यातून तब्बल एक लाख १० हजार मेट्रिक टन कांदा निर्यात झाल्याची माहिती शेतीमाल निर्यात सनियंत्रण कक्षाचे प्रमुख डॉ. भास्कर ना. पाटील यांनी लोकमतला दिली. द्राक्षे (५,५०० टन), आंबा (३ हजार टन), केळी (१५,००० मे. टन) व भाजीपाल्याची (१५,००० मेट्रिक टन) चांगली निर्यात झाली आहे.>शेतकऱ्यांनी कोरोनाच्या संकट काळातही अडचणींवर मात करत निर्यातक्षम भाजीपाला व फळांचे उत्पादन केले. पणन मंडळाच्या समन्वयातून आपण एप्रिल महिन्यात युरोपासह आखाती देशांमध्ये समुद्रमार्गे चांगली निर्यात करू शकलो. परदेशात मसाले, धान्यालाही चांगली मागणी आहे.- डॉ. भास्कर पाटील, कक्षप्रमुख, शेतीमाल निर्यात सनियंत्रण कक्ष