Join us

राज्यात साकारणार कांदा महाबँक; मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 06:07 IST

अणुऊर्जेच्या माध्यमातून प्रक्रिया करून साठवणुकीची सोय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या ठिकाणी अणुऊर्जेच्या माध्यमातून कांद्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची साठवणूक केली जाणार आहे.

कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे गुरुवारी बैठक झाली. कांदा बँकेची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून होत आहे. या ठिकाणी हिंदुस्थान अग्रोच्या माध्यमातून कांद्याची बँक सुरू होत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

समृद्धी महामार्गालगत सुमारे १० ठिकाणी कांद्याची बँक करण्याचे प्रस्तावित असून, त्याच्या कामाला गती द्यावी. शेतकऱ्यांच्या हिताचा हा प्रकल्प असून, कांद्याच्या महाबँकेमुळे कांद्याची साठवणूक करता येईल आणि जेव्हा चांगला भाव असेल तेव्हा शेतकऱ्यांना विक्री करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

या बैठकीला पणनमंत्री अब्दुल सत्तार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.

काकोडकरांचीही हजेरी

परमाणू आयोगाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. तसेच जेएनपीटी, अपेडा, डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्र यांचे संचालक व अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.

 

टॅग्स :एकनाथ शिंदेकांदा