Join us

मुंबईत कांदा रडवू लागला; ३५ रुपये किलोने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 5:33 AM

आवक घटल्याने दर वाढले : लसणीचे दरही वाढू लागले

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक कमी होऊ लागल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. होलसेल मार्केटमध्ये कांदा २४ ते २८ रुपये किलो दराने विकला जात असून, किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ३५ रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत.राज्यभर सुरू असलेल्या पावसाचा परिणाम शेतीवर झाला आहे. काही ठिकाणी योग्यपद्धतीने लागवड होऊ शकली नाही तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे. याचा परिणाम कृषी मालाच्या आवकवरही होत आहे. पावसाळी हंगामामध्ये कांदा उत्पादन किती होईल याची खात्री नसल्यामुळे उन्हाळ्यातील कांदा जपून वापरला जाऊ लागला आहे.

मुंबई बाजार समितीमध्ये एक महिन्यापूर्वी नियमित १०० ते १२५ ट्रक, टेम्पोमधून कांद्याची आवक होत होती; परंतु सद्यस्थितीमध्ये ६० ते ८० वाहनांचीच आवक होत आहे. १ आॅगस्टला होलसेल मार्केटमध्ये १३ ते १६ रुपये प्रतिकिलो दराने कांदा विकला जात होता. दहा दिवसांपूर्वी हेच दर १७ ते २१ रुपये प्रतिकिलो झाले असून, बुधवारी एपीएमसीमध्ये कांदा २४ ते २८ रुपये किलो दराने विकला जात होता. किरकोळ मार्केटमध्येही भाव वाढू लागले असून चांगला कांदा ३० ते ३५ रुपये किलो दराने विकला जात आहे. पुढील दोन महिने कांद्याचे दर तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईमध्ये कर्नाटकमधूनही कांदा विक्रीसाठी येत असतो. प्रत्येक वर्षी आॅक्टोबरमध्ये दक्षिणेकडून कांदा विक्रीसाठी येत असतो. यावर्षी तेथून कांदा उशिरा मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. इतर राज्यातही पुरेसा कांदा नसल्यामुळे दर वाढत आहेत. लसूणचीही आवक घटली आहे. दहा दिवसांपूर्वी बाजार समितीमध्ये १० ते ६५ रुपये किलो दराने लसूण विकली जात होती. बुधवारी हेच दर २० ते ८५ रुपयांवर गेले आहेत.

भाजीपाल्याचे दर नियंत्रणातकांदा व लसणीचे दर वाढत असताना भाजीपाल्याचे दर मात्र नियंत्रणात येऊ लागले आहेत. दहा दिवसांपूर्वी होलसेल मार्केटमध्ये फरसबी ८० ते १०० रुपये किलो दराने विकली जात होती. बुधवारी हेच दर ३० ते ४० रुपये किलो असे झाले आहेत. फ्लॉवरचे दर ३० ते ३६ वरून २० ते २६ झाले आहेत. गवार ६० ते ८० वरून ५० ते ५६ रुपये झाले आहेत. कारली ३४ ते ४४ वरून २६ ते ३४ रुपये झाले आहेत. शिराळी दोडका, टोमॅटो व इतर भाज्यांचे दरही कमी झाले आहेत.