नवी मुंबई : आवक घटल्याने राज्यभर कांद्याची भाववाढ सुरूच आहे. सोमवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा ६० ते १०० रुपये किलो अशा उच्चांकी दराने विकला गेला. घाऊक बाजारात पहिल्यांदाच बाजारभावाचे शतक पूर्ण झाले असून किरकोळ बाजारात चांगल्या प्रतिचा कांदा १२० रुपये किलो दराने विकला जात आहे.पावसामुळे राज्यभर कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. अशातच उन्हाळी कांद्याचा साठा संपत आला असून नवीन पीक पुरेशा प्रमाणात आलेले नाही. यामुळे सर्वच बाजारात कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. मुंबईमध्ये शनिवारी १६६६ टन आवक झाली होती. तेव्हा घाऊक बाजारात ५० ते ६० रुपये दराने विक्री झाली. तर सोमवारी १०७८ टन आवक झाली असून बाजारभाव ६० ते १०० रुपये किलो झाले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच कांद्याला प्रति किलो १०० रुपये भाव मिळाला आहे. किरकोळ बाजारातही कांद्याचे दर वाढू लागले आहेत. नवीन कांदा किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये व जुना कांदा १०० ते १२५ रुपये किलो दराने विकला जात आहे.सद्य:स्थितीत मुंबई बाजार समितीमध्ये पुणे व नाशिक जिल्ह्यामधून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. हुबळीवरूनही मालाची आवक सुरू झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. जुना माल संपत आला असून नवीन पीक पुरेशा प्रमाणात आले नसल्यामुळे दर वाढत आहेत. पुढील काही दिवस दरांमध्ये तेजी कायम राहणार आहे, असे मुंबई बाजारसमितीतील कांदा व्यापरी सुरेश शिंदे यांनी सांगितले.हॉटेलमधून कांदा गायबकांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने अनेक हॉटेलमधून जादा कांदा देणे बंद करण्यात आले आहे. सातत्याने भाव वाढत असल्याने कांदा देणे परवडत नाही. त्यामुळे कांद्याऐवजी काकडी, गाजर दिले जात आहे, असे हॉटेल व्यावसायिक सांगत आहेत.
मुंबईत कांद्याला मिळाला शंभर रुपयांचा विक्रमी भाव, किरकोळ बाजारात कांदा १२० रुपये किलो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 6:40 AM