Join us

कांद्याच्या दराने गाठला १२० रुपयांचा टप्पा, बाजारात तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 1:01 AM

मुंबईतील बाजारात कांदा १२० रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे.

मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणात झालेला अवकाळी पाऊस आणि परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्यामुळे कांदा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबईतील बाजारात कांदा १२० रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे.राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. कांद्याचे उत्पादन घटले, तर साठविलेला कांदा पावसामुळे खराब झाला. यामुळे बाजारात कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहे, असे कुर्ला येथील भाजी विक्रेता शंकर घारे यांनी सांगितले.तर कांद्याचा दर दिवसेंदिवस वाढतच आहे, या वाढलेल्या दराचा इतर भाज्यांवर परिणाम होतो. कांदा घेण्यासाठी इतर भाज्यांची खरेदी कमी करावी लागते, असे शोभा सोनावणे म्हणाल्या. रश्मी माने म्हणाल्या की, महिनाभरापूर्वी कांद्याचा दर कमी होता, परंतु आता काही पटीने वाढला आहे. २० रुपयांवरून कांदा आता १२० रुपयांपर्यंत गेला आहे. असेच भाव वाढत राहिले, तर कांदा खाणे सोडण्याची वेळ येईल, असे त्यांनी सांगितले. अक्षय शिर्के म्हणाले की, कांद्याचे भाव वाढत आहेत, परंतु सामान्य नागरिकांना योग्य दरात सरकारने कांदा उपलब्ध करून द्यायला हवा.कोबी, टोमॅटोचा पर्यायकांद्याचे भाव वाढल्यामुळे अनेक हॉटेलमध्ये कांदा देणे बंद केले आहे. यासोबत पाणीपुरी आणि इतर खाद्यपदार्थ खाताना विक्रेते कांद्याऐवजी कोबी, टोमॅटो देत आहेत.

टॅग्स :कांदा