पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने राज्यभर कांद्याची टंचाई सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 03:53 AM2019-11-06T03:53:55+5:302019-11-06T03:54:04+5:30
घाऊक बाजारात दर ७० रुपयांवर : आवक सुरळीत होण्यास एक महिना लागणार
नवी मुंबई : राज्यभर पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान केले असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. नवीन पीक अद्याप पुरेशा प्रमाणात मार्केटमध्ये आलेले नसल्यामुळे कांदाटंचाई निर्माण झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याचे दर ५० ते ७० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ८० रुपयांवर गेले असून, अशीच स्थिती राहिली तर कांदा लवकरच १०० रुपयांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रत्येक वर्षी १५ आॅक्टोबरपर्यंत खरीप हंगामातील कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी येत असतो. मुंबईमध्ये नाशिक व पुणेसह कर्नाटक परिसरामधूनही खरीप कांदा विक्रीसाठी येत असतो. यामुळे सप्टेंबरअखेरीस वाढलेले भाव नियंत्रणामध्ये येण्यास मदत होते; परंतु या वर्षी पावसाने पिकांची सर्व समिकरणेच बदलली आहेत. नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतरहीअद्याप नवीन कांदा पुरेशा प्रमाणात मार्केटमध्ये विक्रीसाठी येत नाही. विक्रीसाठी आलेल्या नवीन मालाचा दर्जाही फारसा चांगला नसल्याने त्याला बाजारभाव मिळत नाही. उन्हाळी कांद्यालाच ग्राहकांचीही पसंती मिळू लागली आहे. यामुळे नवीन कांद्याला दर मिळत नाही व जुन्या कांद्याचे दर प्रत्येक दिवशी वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये मंगळवारी ११९० टन कांद्याची आवक झाली असून, प्रतिकिलो ५० ते ७० रुपयांनी विक्री झाली आहे. किरकोळ मार्केटमध्ये हाच कांदा ६० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे.
बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी सांगितले की, पावसामुळे कांदा पिकाचे मोजता येणार नाही एवढे नुकसान झाले आहे. शेतकºयांना मोठा फटका बसला आहे. नवीन कांदा अद्याप शेतातून काढणे शक्य होत नाही. कांदा खराब होण्याचे प्रमाणही जास्त असून त्याचा परिणाम बाजारभावावर होऊ लागला आहे. नवीन कांदा नियमित मार्केटमध्ये येण्यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे जाणकारांनी सांगितले.
पावसामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आवक सुरळीत सुरू होण्यास अजून एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. नवीन कांदा पुरेशा प्रमाणात विक्रीसाठी येत नाही. यामुळे बाजारभावामध्ये तेजी असून पुढील काही दिवस ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.
- संजय पिंगळे, व्यापारी, कांदा मार्केट
राज्यभरातील घाऊक बाजारातील प्रतिकिलो कांदा दर
मार्केट आवक(टन) दर
मुंबई ११९० ५० ते ७०
सोलापूर १९६३ १ ते ६५
लासलगाव ३१७ २३ ते ५३
नागपूर २० २४ ते ६०
मार्केट आवक(टन) दर
पुणे १४६८ १० ते ५२
राहुरी ११०१ १० ते ५०
कोल्हापूर १७० २० ते ७०