मुंबईत कांद्याचा तुटवडा कायम; मागणीपेक्षा आवक कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 04:24 AM2021-02-12T04:24:31+5:302021-02-12T07:11:32+5:30
घाऊक बाजारात दर ४५ रुपये किलो
नवी मुंबई : मुंबईमध्ये कांदा तुटवडा कायम असून, गुरुवारीही आवश्यकतेपेक्षा कमी आवक झाली. गुजरातवरूनही कांदा मागविला जात आहे. होलसेल मार्केटमध्ये गुजरातचा कांदा १८ ते ३० रुपये व महाराष्ट्रातील कांदा ३८ ते ४५ रुपये किलो दराने विकला जात आहे.
मुंबई, नवी मुंबई परिसरामध्ये सद्य:स्थितीमध्ये सरासरी प्रतिदिन १ हजार टन कांद्याची मागणी आहे; परंतु मागील काही दिवसांपासून आवक कमी होत आहे. गुरुवारी मार्केटमध्ये ७८७ टन कांद्याची आवक झाली असून, यामध्ये ४० टक्के आवक गुजरातवरून होत आहे. फेब्रुवारीमध्ये होलसेल मार्केटमध्ये पहिल्यांदाच कांदा चाळिशीच्या पुढे गेला आहे. पुढील जवळपास एक महिना तुटवडा कायम राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ५० रुपये किलो दराने विकला जात आहे. राज्यातील इतर बाजार समित्यांमध्येही कांद्याचे दर वाढू लागले आहेत.
अवकाळीचा उत्पादनावर परिणाम
आवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. पहिल्यांदाच फेब्रुवारीमध्ये दर वाढले आहेत. सद्य:स्थितीमध्ये महाराष्ट्र व गुजरातवरून कांदा विक्रीस येत आहे.
-राजेंद्र शेळके, व्यापारी
मुंबई बाजार समिती
प्रमुख बाजारपेठेतील आवक व बाजार भाव
बाजार समिती आवक(टन) बाजारभाव
मुंबई ७८७ ३८ ते ४५
कोल्हापूर ३३६ २० ते ४७
औरंगाबाद ७५ १० ते ४२
सोलापूर २,३३४ २ ते ५०
पुणे १,४२५ २० ते ४३