ठाणे : सध्या ३० ते ४० रु. किलो मिळणारा कांदा येत्या काही दिवसांत ७० ते १०० रुपये किलो होण्याची चिन्हे आहेत. तर द्राक्ष आणि डाळींब यांचे भाव दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिना हा द्राक्षाच्या काढणीचा तसेच डाळींब भरात येण्याचा. यावेळेला ही दोन्ही पिके चांगली आली होती. त्यामुळे डाळींब प्रतीनुसार ६० ते १५० रु. किलो असा भाव होता. परंतु जवळपास ८-१० दिवस आलेल्या पावसामुळे व त्या आधीच्या पावसाळी वातावरणामुळे द्राक्षाचे ५० टक्क््यांहून अधिक पीक हातातून गेले आहे व जे पीक वाचले त्याची प्रत खालावली आहे. त्यामुळे यावेळी द्राक्षे मुळातच कमी आणि जी आहे ती १५० ते २०० रु. किलो भावाने उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. तसेच डाळींबाचे झाले असून डाळींबांची आवक प्रचंड प्रमाणात घटून त्याचे भाव दर्जानुसार २०० ते ४०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. बाजारात मालच नसेल किंवा मागणी पेक्षा आवक कमी असेल तर भाव भडकणार हे स्वाभाविक आहे, अशी प्रतिक्रीया बागायतदारांनी व्यक्त केली आहे.कांदा चाळीत आणि शेतात अशा दोन स्वरुपात होता. परंतु सलग दोन आठवडे प्रचंड प्रमाणात झालेल्या पावसाने शेततले कांद्याचे पीक जसे नष्ट केले तसेच चाळीतील कांदाही जमीनीतून वर आलेल्या वाफाऱ्याने व वातावरणातील दमटपणा मुळे नासवून टाकला. सगळ्या कांद्यांना कोंब फुटणे अथवा आत टोंगळा निर्माण होणे किंवा ते आतून सडणे असा प्रकार झाला आहे. म्हणजे हाती आलेले व साठवलेले उत्पादनही गेले आणि शेतातून येऊ घातलेले पीकही गेले आहेत. यामुळे कांदा प्रचंड महागणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
कांदा पुन्हा सगळ्यांना रडविणार
By admin | Published: November 19, 2014 11:05 PM