Join us

मुंबईकरांना कांदा रडवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 6:24 AM

पुरेशा पावसाअभावी बाजारभाव दुप्पट : किरकोळ बाजारात भाव गेला २८ रुपयांवर

- नामदेव मोरे 

नवी मुंबई : पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे राज्यात कांद्याच्या दरामध्ये वाढ होऊ लागली आहे. मुंबई बाजारसमितीमध्ये आठ ते दहा रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा १६ ते २४ रुपयांवर गेला असून, किरकोळ मार्केटमध्ये हेच दर २५ ते २८ रुपये किलो एवढे झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सातत्याने वाढत आहेत. सप्टेंबरमध्ये होलसेल मार्केटमध्ये कांदा आठ ते दहा रुपये किलो दराने विकला जात होता. किरकोळ मार्केटमध्ये १२ ते १५ रुपये दराने मिळत होता, परंतु या आठवड्यामध्ये होलसेल मार्केटमधील दर दुप्पट झाले आहेत. बाजार समितीमधील व्यापारी प्रतिनिधी अशोक वाळूंज याविषयी म्हणाले की, या वर्षी समाधानकारक पाऊस पडलेला नाही. खरिपाच्या पिकावर परिणाम झाला आहे. दसऱ्याला नवीन कांदा मार्केटमध्ये येण्यास सुरुवात होते, परंतु या वर्षी उशीर होणार आहे. कारण त्याचे पीकही समाधानकारक नाही. यामुळे उन्हाळी कांदा पुढील दीड ते दोन महिने पुरवून वापरावा लागणार आहे. तोपर्यंत भाववाढ सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.

सद्यस्थितीत चाळीमध्ये साठविलेला कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी येत आहे. मागणी व पुरवठा यामध्ये फरक पडत असल्यामुळे बाजारभाव वाढत आहेत. पुढील एका महिन्यात मुंबईतील कांद्याचे दर अजून वाढण्याची भीती व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.

तसेच पुणे व नाशिकमधून मुंबईत कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. शुक्रवारी १,८३४ टन आवक झाली असून, अशीच आवक कायम राहिली पाहिजे. आवक घसरली, तर बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :कांदा