मुंबई : समाजातील आर्थिक आणि दुर्बल घटकांना समान शिक्षणाची संधी मिळावी म्हणून दुसरी आणि आठवी इयत्तेत जागा राखीव असतात. शिक्षणहक्क कायद्यानुसार या जागा भरताना आॅनलाइन पद्धतीचा वापर करावा, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. कारण, काही वेळा या प्रवेशांमध्ये अडवणूक होत असल्याची माहिती अनुदानित शिक्षा बचाव समितीने दिली. पालकांची होणारी अडवणूक थांबावी. दुसरी आणि आठवीच्या जागा रिक्त न राहता मुलांना शिक्षण मिळावे या मागणीसाठी अनुदानित शिक्षा बचाव समितीचे निमंत्रक के. नारायण यांनी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांना निवेदन सादर केले आहे. यापुढे आता कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेतर्फे मुंबईतील शाळांमध्ये हे प्रवेश दिले जातात. यासाठी आॅनलाइन पद्धतीचा वापर केला जातो. या प्रक्रियेत इयत्ता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश देण्यात येतो. त्याचप्रमाणे इयत्ता दुसरी आणि आठवीसाठीही प्रवेश दिला जातो. पण, या दोन इयत्तांमध्ये जागा रिकाम्या राहतात. तरीही शाळा पालकांना कळवत नाहीत. दुसऱ्या विद्यार्थ्यांना या जागांवर प्रवेश दिला जातो. हे टाळण्यासाठी ही मागणी करण्यात आली आहे.१० जानेवारी २०१७ रोजी शालेय शिक्षण विभागाने सरकार निर्णय जाहीर करीत दुसरी ते पाचवीच्या वर्गांतील रिक्त जागा इतरांना न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे प्रवेश लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करताना पालकांनी वरील मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
राखीव जागांवरील प्रवेश आॅनलाइन करा
By admin | Published: April 25, 2017 1:50 AM