ऑनलाइन ॲप आधारित कोर्सला बसणार चाप; मान्यता नसताना शिकवणाऱ्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 08:32 AM2022-01-18T08:32:16+5:302022-01-18T08:32:28+5:30
युजीसी आणि एआयसीटीई या दोन्ही संस्था एकत्र आल्या असून, असे शैक्षणिक करार करणाऱ्या कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांवर यापुढे कारवाई करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
मुंबई : हल्ली विविध सोशल माध्यमावर विविध ऑनलाइन शिक्षण किंवा ॲप आधारित शिक्षण देणाऱ्या कंपन्यांचे मोठे प्रस्थ पसरत असल्याचे दिसत आहे. या कंपन्या आणि शिक्षण संस्था अशा ऑनलाइन किंवा ॲप आधारित अभ्यासक्रमांचे शिक्षण, पदव्या देण्याचा दावा करून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अशा फसवणुकीविरोधात आता युजीसी आणि एआयसीटीई या दोन्ही संस्था एकत्र आल्या असून, असे शैक्षणिक करार करणाऱ्या कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांवर यापुढे कारवाई करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
सद्य:स्थितीत ऑनलाइन शिक्षणामुळे शैक्षणिक संस्था विविध तंत्रज्ञान कंपन्यांशी हातमिळवणी करीत विविध ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहेत. मात्र, या शैक्षणिक संस्था किंवा कंपन्या हे सामंजस्य करार आपापसांत करतात आणि त्याची माहिती एआयसीई किंवा यूजीसीसारख्या शिखर संस्थांना दिली जात नाही. अनेकदा एआयसीईटीची मान्यता असलेले अभ्यासक्रम, मान्यता न घेता विद्यार्थ्यांना उपलब्ध केल्याची बतावणी ही या प्रक्रियेत होत असल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार चुकीचा असल्याने यासंदर्भात कारवाईचा इशारा यूजीसीने दिला.