पहिल्याच दिवशी ९३३ जणांनी भरले घरासाठी आॅनलाइन अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 02:45 AM2018-07-20T02:45:35+5:302018-07-20T02:45:56+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडाचा घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे परवडणाऱ्या घरांसाठी ९,०१८ सदनिकांची विक्रमी लॉटरी नुकतीच जाहीर करण्यात आली.
मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडाचा घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे परवडणाऱ्या घरांसाठी ९,०१८ सदनिकांची विक्रमी लॉटरी नुकतीच जाहीर करण्यात आली. गुरुवारी दुपारी २ वाजल्यापासून या लॉटरीच्या आॅनलाइन अर्जदार नोंदणीला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ९३३ अर्जदारांनी म्हाडाच्या या परवडणाºया घरांसाठी आॅनलाइन अर्ज भरले तर गेल्या २४ तासांत २९५७ अर्जदारांनी घरांसाठी नोंदणी केली आहे.
या वर्षीच्या कोकण विभागाच्या लॉटरीत २०१६च्या तुलनेत दुप्पट घरे असल्याने आॅनलाइन नोंदणीलाही पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ९०१८ घरांचा पर्याय उपलब्ध असल्याने म्हाडाच्या गुरुवारी सुरू झालेल्या आॅनलाइन नोंदणीला दुपारी २ वाजल्यापासूनच चांगला प्रतिसाद मिळाला.
आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत ८ आॅगस्टला रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. १० आॅगस्टला सायंकाळी ६ वाजेपर्यंत अनामत रक्कम / अर्ज शुल्क आॅनलाइन भरण्याची मुदत आहे. कोकण मंडळातर्फे यंदा प्रथमच अर्जदारांना एनईएफटी / आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम भरता येणार असल्याने पहिल्याच दिवशी अर्जदारांनी आॅनलाइन नोंदणीस चांगला प्रतिसाद दिला.
सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठीच्या घरांचा समावेश आहे. विरार-बोळींज भागात जास्त घरे असल्याने या भागातील घरांसाठी जास्त करून अर्जदारांची आॅनलाइन नोंदणी होत असल्याची माहिती कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने यांनी दिली. दुपारी २ वाजता आॅनलाइन नोंदणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद आश्वासक आहे. ८ आॅगस्टपर्यंत ही संख्या वाढत जाईल अशी अपेक्षाही लहाने यांनी व्यक्त केली.
यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी मीरा रोड, बाळकुम ठाणे, शिरढोण (ता. कल्याण), खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील एकूण ४,४५५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. अल्प उत्पन्न गटासाठी मीरा रोड, कावेसर ठाणे, वेंगुर्ला-सिंधुदुर्ग, विरार-बोळींज, खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील ४३४१ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी बाळकुम (ठाणे), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी), विरार-बोळींज येथील एकूण २१५ सदनिकांचा समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटासाठी वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी) येथील एकूण ७ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.