Join us

मित्राशी वाद मिटतील, एक पूजा करावी लागेल! ऑनलाईन ज्योतिषाचा तरुणीला चुना

By गौरी टेंबकर | Published: May 07, 2024 4:27 PM

गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. 

गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मित्रासोबतचे मतभेद मिटवण्यासाठी एका २४ वर्षीय तरुणीने ऑनलाईन अनोळखी ज्योतिषाची मदत घेत त्यासाठी पूजाविधी करण्याचे ठरवले. मात्र यामार्फत ती सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकली आणि तिला हजारो रुपयांचा चुना लावण्यात आला. या विरोधात तिने सांताक्रुज पोलिसात धाव घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. 

तक्रारदार कुसुम (नावात बदल ) एका खाजगी कंपनीत काम करत असून सांताक्रुज पश्चिम परिसरात आई-वडील आणि कुटुंबासोबत राहते. तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या आईच्या मोबाईलवर असलेला इंस्टाग्राम अकाउंटवर एका ज्योतिषाबाबत चॅटिंगसाठी लिंक आली होती. तिने त्यावर क्लिक केले असता तिला एक मोबाईल नंबर मिळाला. कुसुमने तिच्या व्हाट्सअप क्रमांकवरून चॅटिंग सुरू केल्यावर समोरच्या व्यक्तीने तो ज्योतिषी असल्याचे सांगत व्हॉट्सॲप कॉल करत तरुणीची माहिती मागितली. त्यानुसार तिने माहिती आणि तिचा फोटो त्या भामट्याना पाठवला. समोरील व्यक्तीला तक्रारदाराने फोन केल्यावर त्याने तिला ६ हजार १०० रुपये पाठवायला सांगत एक क्यूआर कोड शेअर केला.

तिने ते पैसे पाठवल्या नंतर पुन्हा तिच्याकडून ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. जे पैसे तिने इथून तिथून गोळा करत एकूण ६६ हजार रुपये सदर क्रमांकावर पाठवले. तुला मित्राकडून फोन येईल जो तू रिसीव्ह करू नको असे भामट्यांनी सांगितले कारण त्यामुळे त्यांचे पितळ उघडे पडत तो फेक कॉल आहे हे तिला समजले असते. कुसुमने त्यांच्यावर विश्वास ठेवत फोन उचलला नाही. मात्र नंतर तिने तिच्या मित्राला फोन केल्यावर त्याने तिला फोन केलाच नसल्याचे सांगितले आणि सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. त्यानंतर तिने सांताक्रुज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :गुन्हेगारी