दक्षिण मुंबईत वाहनतळांची आॅनलाइन बुकिंग
By admin | Published: June 18, 2017 02:58 AM2017-06-18T02:58:35+5:302017-06-18T02:58:35+5:30
नोकरीधंद्यासाठी दक्षिण मुंबईत येणाऱ्यांची वर्दळ अधिक असते. यामध्ये वाहनधारकही मोठ्या संख्येने असतात. मात्र वाहनतळाची सुविधा असूनही कोणत्या ठिकाणी जागा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नोकरीधंद्यासाठी दक्षिण मुंबईत येणाऱ्यांची वर्दळ अधिक असते. यामध्ये वाहनधारकही मोठ्या संख्येने असतात. मात्र वाहनतळाची सुविधा असूनही कोणत्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे, याची माहिती वाहनधारकांना मिळत नाही. त्यामुळे त्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने वाहनतळाच्या ठिकाणी आॅनलाइन बुकिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आॅनलाइन बुकिंग अथवा अॅप आधारित बुकिंग सुविधेच्या पहिल्या टप्प्यात आठ वाहनतळांवर ही सुविधा मिळणार आहे.
या सुविधेची प्राथमिक तांत्रिक चाचणी आयुक्त अजय मेहता यांच्या उपस्थितीत नुकतीच घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी ठरल्यामुळे पुढील तीन महिन्यांत ही सुविधा सुरू होईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले आहे. मात्र वाहनतळावर मनमानी वसुलीच्या यापूर्वी अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे आॅनलाइन सुविधा सुरू करताना पालिकेने विशेष खबरदारी घेतली आहे. त्यानुसार आॅनलाइन बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या वाहनतळांच्या ठिकाणी अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे करण्यात येणाऱ्या छायाचित्रणाचे संगणकीय पद्धतीने विश्लेषण होऊन त्याची माहिती संकेतस्थळ अथवा अॅपद्वारे उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती ए विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
नेहमी येणाऱ्या वाहनधारकांसाठी ‘आरएफआयडी टॅग’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या वाहनांवर महापालिका पार्किंगचे ‘आरएफआयडी टॅग’ असेल असे वाहन वाहनतळावर आल्यावर व वाहन बाहेर पडतानादेखील स्वयंचलित पद्धतीने वाहनतळाचे फाटक उघडेल; तसेच वाहन जेवढा वेळ वाहनतळावर असेल तेवढ्या कालावधीचे पैसे संबंधित वाहनधारकाच्या खात्यातून आपोआप वजा होऊन महापालिकेच्या किंवा ठेकेदाराच्या खात्यात जमा होणार आहेत. वाहनधारकांना या सुविधेमुळे अधिकृत दरातच वाहनतळ सेवा उपलब्ध होण्याची हमी व त्यांची गाडी उभी करण्याबाबत निश्चित जागा असल्याची आगाऊ स्वरूपात खात्री करून घेता येणार आहे.
आॅनलाइन बुकिंगची वैशिष्ट्ये
इंटरनेटवर उपलब्ध होणाऱ्या माहितीमुळे वाहनधारकाला त्याच्या वाहनासाठी कोणत्या वाहनतळावर जागा उपलब्ध आहे, याची माहिती आगाऊ माहिती मिळू शकेल. ज्यामुळे आपली गाडी कोणत्या वाहनतळावर ‘पार्क’ करावी याचा निर्णय वाहनधारकाला वाहनतळावर पोहोचण्यापूर्वीच घेणे शक्य होईल.
आॅनलाइन बुकिंग केल्यानंतर लगेचच वाहनधारकाच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर अथवा अॅपमध्ये एक संदेश येईल. यामध्ये वाहनतळाचा पत्ता, जागा क्रमांक, बुकिंगचा कालावधी, वाहनक्रमांक आदी तपशील असेल. याच ‘एसएमएस’ची एक प्रत वाहनतळावर कार्यरत असणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याला प्राप्त होईल. विशेष म्हणजे प्रस्तावित अॅपद्वारे वाहनचालकाला वाहनतळापर्यंत जाण्याचा मार्गदेखील जीपीएसच्या साहाय्याने दिसू शकेल.
वाहन संबंधित वाहनतळावर पोहोचल्यानंतर तेथील कर्मचारी वाहन क्रमांकाची खातरजमा करून लगेचच तेथील प्रवेशद्वार उघडेल. विशेष म्हणजे बुकिंग केल्यानंतर निश्चित केलेल्या कालावधीत वाहन वाहनतळावर आले नाही, तर सदर ‘आॅनलाइन बुकिंग’ आपोआप रद्द होऊन ती जागा दुसऱ्या वाहनास उपलब्ध करून देता येऊ शकेल. आॅनलाइन बुकिंग केलेले वाहन हे वाहनतळावरून बाहेर पडतानाही त्याची नोंद होईल. ज्यामुळे बुकिंग कालावधीपेक्षा अधिक काळ वाहनतळ सुविधेचा लाभ घेतला असल्यास अतिरिक्त शुल्क आकारणी करणेदेखील सुलभ होणार आहे.
या ठिकाणी आॅनलाइन वाहनतळ सुविधा
महात्मा जोतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट)जवळील तीन वाहनतळांवर २२२, हुतात्मा चौकातील दोन वाहनतळांवर १४७, काळाघोडाजवळ ५०, इरॉस जंक्शनला ४२ आणि रिगल सर्कलला २४ याप्रमाणे आठ वाहनतळांवर एकूण ४८५ वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध आहेत. या वाहनतळांवर आॅनलाइन अथवा अॅप आधारित बुकिंग सुविधा सुमारे तीन महिन्यांत सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे.
मनमानीला बसणार चाप : आॅनलाइन बुकिंग पद्धतीमुळे एखाद्या वाहनतळावर दिवसभरात किती वाहने उभी होती याची माहिती महापालिकेला संगणकीय पद्धतीने व सहजपणे उपलब्ध होऊ शकणार आहे.