मुंबई :
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांकडून जी-पेच्या माध्यमातून लाचखोरी केल्याच्या १३ घटना उघडकीस आल्यानंतर आता मुंबई विमानतळावरील कस्टम विभागाने ‘साफसफाई’ मोहीम हाती घेतली असून विमानतळावर कार्यरत २० अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. जी-पेच्या माध्यमातून मुंबई विमानतळावर जोरदार लाचखोरी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम २ फेब्रुवारीला प्रसिद्ध केले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बदली झालेल्या २० अधिकाऱ्यांमध्ये विमानतळावर कार्यरत कस्टम गुप्तचर विभाग, कार्गो आणि झोन-१ या विभागात हे अधीक्षक कार्यरत होते. गेल्या दोन महिन्यांमध्ये हे अधिकारी आणि त्यांच्या टीममधील कर्मचाऱ्यांनी जी-पेच्या माध्यमातून लाचखोरी केल्याच्या एकूण १३ घटना उजेडात आल्या असून यापैकी १० प्रकरणांत सीबीआयने गुन्हादेखील दाखल केला आहे. तसेच, या प्रकरणी आतापर्यंत २ अधीक्षक, २ निरीक्षक आणि एक हवालदार यांना अटक देखील झालेली आहे. याखेरीज याचप्रकरणी मार्चमध्ये मुंबई विमानतळावरील प्रिन्सीपल कमिशनरने एकूण ३८ कस्टम अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. बदली केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कस्टम हाऊस तसेच त्यांच्या मूळ केडरमध्ये पाठविण्यात आले होते; परंतु, त्यावेळी बदली झालेले अधिकारी हे कनिष्ट दर्जाचे अधिकारी होते. अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर फारशी कारवाई झाली नव्हती. मात्र, आता या साफसफाई मोहिमेअंतर्गत २० अधीक्षकांच्या बदल्या करून दणका दिला आहे.
वार्षिक बदल्या होण्याच्या काही दिवस अगोदरच ही बदल्यांची कारवाई झाली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या ठिकाणी तातडीने नव्या अधीक्षकांची नेमणूक केली असून कस्टम विभागाच्या अन्य कार्यालयांत हे कर्मचारी कार्यरत होते. त्यांना मुंबई विमानतळावर आणण्यापूर्वी त्यांचे बॅकग्राऊंड तपासले आहेत.
६ महिन्यांत जमा केले १ कोटी २० लाख रुपये जी-पेच्या माध्यमातून लाचखोरी केल्याप्रकरणी सीबीआयने आलोक कुमार नावाच्या कस्टम अधीक्षकाला अटक केली होती. सीबीआयने केलेल्या चौकशीत त्याने प्रकाश अंबेडे या विमानतळावर बॅगेज लोडरचे काम करणाऱ्या व्यक्तीचे नाव घेतले. प्रकाश अंबेडे याने सीबीआयच्या अधिकाऱ्यांना आणखी सहा लोडरची माहिती दिली. या सर्व लोडरची सीबीआयने चौकशी केली असता त्यांच्या जी-पे खात्यामध्ये ६ महिन्यांत १ कोटी २० लाख रुपये जमा झाल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले.
कशी झाली लाचखोरी?परदेशातून येणाऱ्या प्रवाशाच्या तपासणीचे निमित्त करून त्याच्याकडील वस्तूवर शुल्क व दंड भरावे लागेल, असे त्या प्रवाशाला सांगितले जाई. त्याच्याकडे किमान २५ हजार ते पुढे कितीही पैशांची मागणी करायचे. एखाद्या व्यक्तीने तेवढी रोख रक्कम आपल्याकडे नाही असे सांगितले तर त्याला ती रक्कम जी-पे करण्याचा पर्याय हे अधिकारी द्यायचे.