मुंबई : शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी ऑनलाइन मोहीम कशी तयार करायची, निर्णयकर्त्यांसमोर ठेवण्यासाठी आपली मागणी कशी तयार करायची, आपले लक्ष्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी धोरण, आपला आवाज जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा कसा वापर करायचा, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींपासून ते शासकीय अधिकारी असलेल्या निर्णयकर्त्यांवर कृतीच्या मागणीसाठी कसा प्रभाव टाकू शकतात, याचे प्रशिक्षण कार्यशाळेत देण्यात आले.
युथ की आवाजतर्फे मुंबई सेंट्रल येथे क्लायमेट अॅक्शन या विषयावर दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रांत भारताने शून्य उत्सर्जन साध्य करावे, यासाठी सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर कसा करता येईल? यावर भर देण्यात आला.
युथ की आवाजचे संस्थापक अंशुल तिवारी यावेळी म्हणाले, आता आपण हवामानाबाबत कृती करण्यासाठी अधिक गंभीर झाले पाहिजे. आपल्या निर्णयकर्त्यांनाही गंभीर राहण्याची मागणी केली पाहिजे. जगभरात तरुण लोक हवामानाबाबत कृतीची चळवळ चालवत आहेत. भारतातही आपल्या भविष्याबाबत चिंतित असलेले लाखो विद्यार्थी आहेत. आता सरकारने तरुणांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणे थांबविणे आणि हवामान बदलाविरोधात काम करणे गरजेचे आहे.
भारत हा चीन आणि अमेरिकेसारख्या विकसित देशांनंतर ग्रीनहाउस गॅस उत्सर्जन करणारा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. जीवाश्म इंधनांच्या ज्वलनाचा दर वाढत असल्यामुळे कार्बन डाय ऑक्साइड आणि इतर धोकादायक वायूंसारख्या ग्रीनहाउस वायूंचे उत्सर्जन वाढू लागले आहे. त्यामुळे ओझोनचे नुकसान झाले असून, पृथ्वीचे तापमानही वाढू लागले आहे. याच दृष्टिकोनातून भारतात ऊर्जा, वाहतूक, कृषी आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांमधून कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी शाश्वत आणि सुस्पष्ट धोरणाची कमतरता जाणवत असून, ती भरून काढणे गरजेचे आहे, असा सूर यावेळी उमटला.