Join us

...तर ऑनलाइन कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म कापतील खिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 5:53 AM

डायल इन नेटवर्क निवडतानाची निष्काळजी पडेल महागात; ग्राहकांकडून होते ‘आयएसडी’च्या दराने बिल आकारणी

- संदीप शिंदे मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू झालेले लॉकडाऊन आणि फिजिकल डिस्टन्सिंगच्या निर्बंधांमुळे गाठीभेटींवर निर्बंध आले आहेत. यातून मार्ग काढत झूम, वेबेक्स, ब्लू जीन्स यांसारख्या वेगवेगळ्या विनामूल्य ऑनलाइन कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मात्र, या कंपन्यांच्या कार्यपद्धतीत झालेला बदल ग्राहकांचा खिसा कापू शकतो. आयएसडी कॉल केला नसतानाही आंतरराष्ट्रीय फोन कॉल्सची बिले अनेकांच्या हाती पडली आहेत.आॅफिसची कॉन्फरन्स असो, विद्यार्थ्यांचे शाळा-महाविद्यालयातील लेक्चर्स असो, वेबिनार्स असो किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम, वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या कुटुंबांच्या गाठीभेटीही सध्या झूम, वेबेक्स, ब्लू जीन्ससारख्या ऑनलाइन कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मवरच होत आहेत. या इंटरनेट बेस कॉलसाठी डेटा खर्च होत असल्याने ग्राहकांकडून अतिरिक्त शुक्ल आकारले जात नाही. मात्र, या सेवांचा भविष्यात होणारा विस्तार आणि त्यातून मिळणाऱ्या महसुलावर डोळा ठेवत भारतातील बड्या टेलिकॉम कंपन्यांनी या ऑनलाइन प्लॅटफॉर्म कंपन्यांशी भागीदारीचे नवे पर्व सुरू केले आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मच्या कार्यपद्धतीत बदल झाले आहेत.पूर्वी आॅडिओ आणि व्हिडीओ डेटा नेटवर्कच्या माध्यमातूनच उपलब्ध व्हायचा. मात्र, आता आॅडिओसाठी टेलिकॉम कंपन्यांनी व्हॉइस नेटवर्कचा वापर सुरू केला आहे.अशी होते वापरकर्त्यांची फसगतआॅनलाइन बैठकीसाठी योग्य नेटवर्क उपलब्ध होत नसेल तर गेल्या काही दिवसांपासून कनेक्ट टू आॅडिओ (डायल इन नंबर) अशी लिंक (पॉप अप विंडोमध्ये) दिली जाते. त्यावर क्लिक केल्यानंतर वेगवेगळे नंबर येतात. बैठकीत व्यत्यय येत असल्याने अनेकदा ग्राहक ते नंबर कुठल्या देशातले आहेत हे न तपासताच क्लिक करतात. त्यानंतर तेथे विचारणा केल्यानुसार कॉन्फरन्स आणि यूजर आयडी टाकून पुन्हा बैठकांमध्ये किंवा शाळा, महाविद्यालयांच्या लेक्चर्समध्ये सहभाग घेतला जातो. हा पर्याय निवडल्यानंतर प्रचलित व्हॉइस कॉलच्या दरानुसार बिल आकारणी सुरू होते. अनावधानाने क्लिक केलेली पहिली लिंक परदेशातील असेल तर आयएसडी दर लागू होत असल्याची माहिती एका नामांकित आॅनलाइन प्लॅटफॉर्मच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली.कंपन्यांचे अलर्टआम्ही इंटरनॅशनल कॉल केलाच नाही तरी आम्हाला हे बिल कसे आले, अशा तक्रारींचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढू लागले आहे. त्यामुळे एअरटेलसह अन्य काही कंपन्यांनी ग्राहकांना सतर्क करणारे एमएमएस पाठवणे सुरू केले आहे. आयएसडी चार्ज लागू नये यासाठी मीटिंग इंटरनेट लिंक किंवा टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहनही केले जात आहे. झूमच्या हेल्प सेंटरवरही प्लॅटफॉर्म आणि डायल इन नेटवर्कच्या सुरक्षित वापराबाबतची मार्गदर्शक तत्त्वेही देण्यात आली आहेत.सावध राहणे गरजेचे : या प्लॅटफॉर्मवर मीटिंगची नोंदणी करताना विविध देशांचे सशुल्क आणि टोल फ्री क्रमांक दिलेले असतात. मीटिंग सुरू होण्यापूर्वीच आयोजकाने योग्य डायल इन नंबर निवडून तो सदस्यांना उपलब्ध करून द्यायला हवा. पोस्टपेड ग्राहकांनी आपल्या फोनवर आयएसडी सुविधा बंद केली तर परदेशातील क्रमांक निवडताना अलर्ट मिळू शकतो. टोल फ्री क्रमांक निवडला तरी त्याला टेलिकॉम कंपन्यांच्या स्थानिक दरानुसार आकारणी होते हे लक्षात घ्यायला हवे, असे या क्षेत्रातले अभ्यासक आशिष राजगोर यांनी सांगितले. तसेच, देशांतर्गत होणाºया मीटिंगसाठी प्राधान्यक्रमाने स्थानिक क्रमांकच उपलब्ध करण्याची सक्ती या कंपन्यांना केली तर फसगत होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या