लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने ऑनलाईन समारंभ आयोजित केला आहे. यंदा गलवान घाटीमधील भारतीय लष्कराचे कर्नल बी. संतोष बाबू यांना मरणोत्तर स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार सावरकरांच्या जयंतीनिमित्त देण्यात येतो. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर समाज सेवा पुरस्कार हा राष्ट्रीय पुण्याच्या स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला देण्यात येणार आहे. २८ मे रोजी सायंकाळी ७ वाजता हा समारंभ पार पडणार आहे.
यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे सावरकरांची विज्ञाननिष्ठा या विषयावर आपले विचार मांडतील.
गतवर्षी गलवान घाटीमध्ये १६ बिहार रेजिमेंटचे कर्नल बी. संतोष बाबू यांनी चिनी लष्कराच्या आक्रमणामध्ये आपला देह देशासाठी अर्पण केला होता. त्यांच्या आणि त्यांच्याबरोबरच्या भारतीय जवानांनी देशासाठी असीम बलिदान दिले होते. त्यासाठी सावरकर स्मारकाच्यावतीने हा 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार' कर्नल बी. संतोष बाबू यांना देण्यात येणार आहे. त्यांच्या वीरपत्नी हा पुरस्कार ऑनलाईन स्वीकारणार आहेत. तर कोरोनाच्या कठीण काळात पुण्यामध्ये विविध ठिकाणी केलेल्या मदतकार्याबद्दल रा. स्व. संघ जनकल्याण समिती पुणे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी गलवान घाटीतील युद्ध या विषयावर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन तसेच त्या घाटीत प्राणाची बाजी लावणाऱ्या १६ बिहार रेजिमेंटबद्दल लेफ्टनंट जनरल अश्विनीकुमार बक्षी माहिती देणार आहेत.
..............................................