Join us

‘त्या’ ५०० अफगाणी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:12 AM

मुंबई : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी माजवलेल्या हिंसाचाराचा फटका विद्यार्थ्यांनाही बसला आहे. राज्यातील विविध विद्यापीठांत प्रवेश घेतलेल्या जवळपास ५०० अफगाणी विद्यार्थ्यांचे ...

मुंबई : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी माजवलेल्या हिंसाचाराचा फटका विद्यार्थ्यांनाही बसला आहे. राज्यातील विविध विद्यापीठांत प्रवेश घेतलेल्या जवळपास ५०० अफगाणी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण गेल्या पाच दिवसांपासून थांबल्याची माहिती ‘सरहद’ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांनी दिली.

हे सर्व विद्यार्थी कोरोनामुळे मायदेशी परतले होते. या काळात त्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू होते. मात्र, १२ ऑगस्टपासून ते शिक्षणाच्या कक्षेबाहेर गेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी ‘सरहद’चे प्रयत्न सुरू आहेत. तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यामुळे तेथील नागरिकांत टोकाची भीती पसरली आहे. घराबाहेर पडणेही जीवघेणे बनले आहे. कित्येक जण मारले गेल्याची माहिती तेथून परतलेल्यांनी दिल्याचे नहार यांनी सांगितले. आम्ही तेथील काही विद्यार्थी, दूतावासातील अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. ४८ तासांनंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.

पुण्यातील दोन अफगाणी कुटुंबे संपर्काबाहेर आहेत. गेल्या १४ वर्षांपासून पुण्यात राहत असलेले हे कुटुंबीय अलीकडेच अफगाणिस्तानात गेले होते. मात्र, सध्या ते ट्रेस होत नसल्याची माहिती समोर आल्याचे नहार यांनी सांगितले.