Join us

ऑनलाईन शिक्षण अन्‌ मोबाईलने लावला मुलांना चष्मा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:06 AM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शाळा भरत आहे. मात्र, हे शिक्षण लहान मुलांच्या आरोग्यावर परिणामकारक ...

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शाळा भरत आहे. मात्र, हे शिक्षण लहान मुलांच्या आरोग्यावर परिणामकारक ठरत असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विविध शारीरिक आजारांसोबतच आता डोळ्यांच्या समस्या देखील उद्भवू लागल्या आहेत. यामुळे लहान मुलांना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पालकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण आहे.

ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल, लॅपटॉप व काॅम्प्युटर स्क्रीन समोर बसून रहावे लागत असल्यामुळे डोळ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे मैदानी खेळ खेळले जात नसल्यामुळे हे आजार बळावत आहेत. यामुळे आता नेमके करायचे काय असा प्रश्न लहान मुले व पालकांसमोर उभा राहिला आहे.

लहान मुलांवर घरातील ज्येष्ठ नागरिकांचा वचक असायला हवा. त्यांना मोबाईल केवळ शिक्षण घेण्यासाठीच हातात द्यायला हवा. टेक्नॉलॉजी सोबत जुळवून घ्यायचे असले तरीदेखील आरोग्य हे जपलेच पाहिजे. त्यासाठी मोबाईलचा अतिवापर योग्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून...

- ॲंटीग्लेयर चष्मा वापरावा.

- संगणक स्क्रीनवर ॲंटी ग्लेयर ग्लास बसवावी.

- प्रत्येक ऑनलाईन तासिकेनंतर डोळे बंद ठेवून डोळ्यांना थोडा आराम द्यावा.

- तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योगाभ्यास व डोळ्यांना आरामदायक व्यायाम नियमित करावा.

- शक्य असल्यास कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करीत मैदानात अथवा मोकळ्या जागेत नियमित फेरफटका मारावा.

- आहारात व्हिटॅमिन सी असणाऱ्या पदार्थांचे प्रमाण वाढवावे.

लहान मुलांना हे धोके

ऑनलाईन शिक्षण गरजेचे झाल्यामुळे आता पालकांना नाईलाजास्तव लहान मुलांच्या हातात मोबाईल द्यावा लागत आहे. मात्र, अनेकदा लहान मुले ऑनलाईन शिक्षणापेक्षा गेम खेळण्यासाठी मोबाईलचा वापर करतात. हे गेम खेळल्यामुळे लहान मुले एकाच जागी बसून राहतात. त्यामुळे त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. यामुळे डोळ्यांचा त्रास, सतत चिडचिड हे प्रकार जास्त प्रमाणात होत आहेत. त्यामुळे सतत मोबाईल आणि संगणक वापरणे टाळायला हवे.

लहान मुलांमध्येही डोकेदुखी वाढली

संगणक आणि मोबाईलच्या अतीवापरामुळे मुलांमध्ये डोकेदुखी, डोळ्यांतून पाणी येणे, चिडचिडेपणा, लठ्ठपणा, पाठीचे आजार असे प्रकार वाढत आहेत. संगणक किंवा मोबाईलच्या डिस्प्ले स्क्रीनमध्ये असणाऱ्या एलसीडी व एलईडी दिव्यांमुळे मुलांच्या डोळ्यांवर परिणाम करत असते. यामुळे सतत त्या स्क्रीन पुढे बसल्यावर डोळे लालदेखील होतात. याचा थेट परिणाम शरीरातील इतर भागांवर होतो. त्यामुळे डोकेदुखीसारखे प्रकार वाढीस लागतात. असे नेत्ररोग तज्ज्ञ पियूष झा यांनी सांगितले.

पालकही चिंतेत

आधी लहान मुलांनी मोबाईल मागितला तर त्यांना पालकांकडून विरोध केला जायचा. मात्र, आता ते शिक्षणासाठी हक्काने हातात मोबाईल घेत आहेत. अनेकदा शिक्षणासोबतच व्हिडिओ गेममुळे ते सतत मोबाईलवरच असतात. याचे त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होत आहेत. मात्र, मोबाईलसाठी लहान मुलांचा हट्टपणादेखील वाढला आहे. त्यामुळे एक पालक म्हणून चिंता वाटते.

- प्रमोद अडसूळ, पालक

मुलांना शाळेतूनच मोबाईलच्या अतिवापराच्या दुष्परिणामाचे धडे द्यायला हवेत. हल्ली मुले मैदानी खेळ विसरली आहेत. याचे त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. एवढ्या लहान वयातच मोबाईलमुळे चष्मा लागला तर अजून पुढे काय होईल याची चिंता सतावत आहे. त्यासाठी लहान मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

- गौरव देसाई, पालक