मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्याने व दिवाळीची सुट्टी संपल्याने सोमवारपासून पुन्हा विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू हाेईल. सध्यस्थितीची गरज म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी भविष्यात ते पारंपरिक शिक्षणाची जागा घेऊन प्रभावी ठरेल असे १५ टक्के पालकांना वाटते. तर पारंपरिक शिक्षणाची जागा ऑनलाइन शिक्षण घेऊच शकत नाही, असे ठाम मत ६३ टक्के पालकांनी मांडले. दुसरीकडे २१ टक्के पालकांना ऑनलाइन व पारंपरिक शिक्षणात प्रभावी माध्यम नेमके काेणते हेच सांगता आले नसल्याचे सर्वेक्षणातून समाेर आले.
शिक्षक व समुपदेशक जयवंत कुलकर्णी यांनी ऑनलाइन शिक्षणासंदर्भात राज्यातील पालकांच्या समस्या, निरीक्षणे, अडचणी सर्वेक्षणाद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ऑनलाइन शिक्षणाबाबत ४० टक्के पालकांनी आपला अनुभव साधारण असल्याचे तर ३३ टक्के पालकांनी समाधानकारक असल्याचे सांगितले. ६.३ टक्के पालकांनी तो अतिशय वाईट तर १३ टक्के पालकांनी अतिशय चांगला असल्याचे मत मांडले.
ऑनलाइन’मध्ये नेटवर्कची समस्याऑनलाइन शिक्षण देताना सर्वाधिक पालकांना नेटवर्क प्रॉब्लेम येत असल्याच्या तक्रारी केल्या.
13 %पालकांनी त्यांच्याकडे स्मार्टफोन नसल्याचे सांगितले. शिक्षकांनी ऑनलाइन शिकवलेले समजत नसल्याच्या तक्रारीही पालकांनी केल्या.
यासोबतच शाळेचे सदोष वेळापत्रक, अभ्यास घेण्यास वेळ देता न येणे, आर्थिक ओढाताण, कुटुंबातील आजारपण अशा गोष्टीही समस्या म्हणून पालकांनी सर्वेक्षणादरम्यान मांडल्या.
अनेक पालकांची समुपदेशनाला संमती नसली तरी ऑनलाइन शिक्षणाच्या काळात ऑनलाइन अभ्यासाशी तडजोड करण्यासाठी, तो समजावून घेण्यासाठी आणि पुढील अभ्यासाची वाटचाल कशी करावी याच्या मार्गदर्शनासाठी समुपदेशनाची गरज असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. पालक, विद्यार्थ्यांसाेबतच शिक्षकांच्या समुपदेशनाचीही गरजही त्यांनी व्यक्त केली.