लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने वर्क फ्रॉम होमला हळूहळू फुलस्टॉप मिळत असून ज्या कर्मचाऱ्यांचे दोन लसीचे डोस पूर्ण झाले आहेत. त्यांना पुन्हा प्रत्यक्ष कामावर रुजू होण्याच्या सूचना मिळू लागल्या आहेत. मात्र, अद्यापही शाळा, शैक्षणिक संस्था ऑनलाइनच सुरू असून, त्या सुरू होण्याचा निर्णय न झाल्याने पालकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. सकाळी मुलांसोबत ऑनलाइन वर्गांना बसायचे की कामासाठी ऑफिसला पळायचे, अशा द्विधा मनस्थितीत अनेक पालक अडकले आहेत. त्यामुळे शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात या मागणीला आता पालकांचा ही पाठिंबा मिळू लागला आहे.
ऑनलाइन शिक्षण हा कोरोना काळातील प्रत्यक्ष वर्गातील शिकवण्यांना पर्याय आहे. मात्र, या दरम्यान लहान असो वा मोठी मुलांच्या हाती स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब आल्याने त्यांचा स्क्रीन टाइम वाढला. त्यामुळे अभ्यासाबरोबरच त्यांचे गेमिंग, इतर ॲप वापरण्याचे व्यसन ही वाढू लागले. ते आटोक्यात ठेवण्यासाठी या काळात अनेक पालकांनी ऑनलाइन शिकवण्या दरम्यान मुलांसोबतच वेळ घालविण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता पुन्हा एकदा ऑफिसेस सुरू झाल्याने त्यांना मुलांच्या ऑनलाइन शिकविण्याच्या दरम्यान त्यांच्यावर लक्ष ठेवणे कठीण झाले आहे. या वेळेत मुले एकटी राहिल्यास त्यांचा स्क्रीन टाइम वाढेल.
मुलं गेम्स खेळण्यात वेळ वाया घालवतील. अभ्यासाशिवाय इतर ॲप्स ते हाताळण्याचा प्रयत्न करतील, अशी भीती पालकांना वाटू लागली आहे. शाळा सुरू झाल्या तर, विद्यार्थी शिक्षकांच्या सहवासात शिकत असल्याने ते निदान स्मार्टफोन, टॅब यांच्या आहारी न जाऊन पालकांची काळजी कमी होईल, असे मत अनेक पालक व्यक्त करीत आहेत.
शाळा बंद असल्यामुळे एकीकडे मुलांच्या शैक्षणिक नुकसानाबरोबर त्यांच्या मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम होत आहे. त्यासाठी पालकांसोबतचा संवाद आतापर्यंत महत्त्वाचा ठरत होता. मात्र, पालक घरी नसल्याने आणि मुले घरात एकटी पडणार असल्याने त्यांची चिडचिड व एकटेपणा वाढेल, अशी भीतीही पालकांना वाटू लागली आहे. त्यामुळे आता शाळा लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घ्यावा, अशी मागणी पालक करू लागले आहेत. शाळेत मुले मित्रांच्या सहवासात असल्याने, शिक्षक सोबत असल्याने त्यांचा संवाद कायम राहतो. तसेच खेळ, इतर उपक्रम यामुळे त्यांचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते.
पालकांची होत आहे कसरत
सगळे अनलॉक झाले आहे. त्यात बऱ्याच जणांचे दोन डोस झाले असून, त्या व्यक्तींना ऑफिसला येण्यास सांगण्यात येते. त्यामुळे नोकरी सोडून मुलांकरता घरी राहणे शक्य नाही. त्यात मुलांकडे सध्या स्मार्टफोन असल्यामुळे त्यांना एकटे ही सोडणे शक्य नाही. त्यामुळे मुलांची शाळा लवकरात लवकर सुरू करावी आणि त्याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा.
मनीषा शिंदे, पालक
घरी एकटे सोडल्यास विद्यार्थ्यांचा अधिकाधिक वेळ गेम खेळण्यात आणि विविध ॲप्सवर सर्चिंग, सर्फिंग करण्यात जातो. त्यामुळे स्क्रीन टाइम वाढतोच; पण त्याचा मानसिकदृष्ट्या वाईट परिणाम होतो. शाळेतील वेळात मुलं मित्रांसोबत रमतात आणि शिकतात, त्यामुळे शाळा आवश्यक आहे.
रवी शिर्के, पालक