मुंबई : कोविड काळात सद्यस्थितीत शिक्षण विभाग पूर्णपणे आॅनलाइन पद्धतीने कार्यरत आहे. मात्र आॅनलाइन पद्धतीचा वापर करताना त्यातील असंख्य तांत्रिक, तसेच इतर अडचणींना विद्यार्थी, शिक्षक दोघांना सामोरे जावे लागत आहे. अनेक विद्यार्थी तर आॅनलाइन शिक्षणापासूनच वंचित आहेत. अशा परिस्थितीत अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या चाचणी परीक्षा घेत आहेत. वर्गातील आॅनलाइन शिक्षणाला उपस्थित विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आणि जे वंचित आहेत ते परीक्षेपासूनही वंचितच राहणार ही गोष्ट शैक्षणिक असमानता निर्माण करणारी आहे. या कारणास्तव शाळांकडून मोजक्याच विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन परीक्षा घेणे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक फूट निर्माण करणे असल्याने त्या घेऊ नयेत अशी मागणी पालक आणि शिक्षक , तसेच शिक्षक संघटनांकडून होत आहे.मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान शाळांकडून ना विद्यार्थ्यांना ना शिक्षकांना कोणालाच उन्हाळी सुट्टी ही देण्यात आली नाही. यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे टॅब, स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटर, लॅपटॉप अशा सुविधा नाहीत त्यांनी या परीक्षा कशा द्याव्यात ? त्यांच्यासाठी या परीक्षांचे मूल्यमापन कसे करणार ? शैक्षणिक दृष्ट्या हे विद्यार्थ्यांसाठी हानिकारक असल्याचे मत शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी व्यक्त केले.काही शाळा तर ऐन गणेशोत्सवात परीक्षांचे नियोजन करत आहेत. विद्यार्थी आपल्या गावी असताना परीक्षा कशा देणार? हा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. त्यामुळे शालेय व्यवस्थापनांना कोविड काळात आॅनलाईा परीक्षा घेऊ नयेत अशा सूचना शिक्षण विभागाने द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.>‘गणपती असल्याने विद्यार्थी-पालक गावी आहेत’आधीच आॅनलाइन शिक्षणापासून वंचित असल्याच्या भावनेने अनेक विद्यार्थी, पालक चिंतेत आहेत. अशातच गणेशोत्सव काळात अनेक विद्यार्थी आपल्या मूळगावी जात असल्याने शाळा व्यवस्थापनांनी या दरम्यान विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणापासूनच सुट्टी द्यावी, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे. विद्यार्थी, पालकांची मानसिकता लक्षात घेऊन आॅनलाइन शिक्षणापासून किमान आठवडाभर सुट्टी देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने लवकरात लवकर घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
ऑनलाइन परीक्षा शैक्षणिकदृष्ट्या हानिकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 2:20 AM