मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बदलासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पत्रकारांशी संवाद साधताना राज्यात ऑनलाइन गेमिंग आणि कसिनो संदर्भातही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. तसेच, याबाबत राज्य सरकारची भूमिकाही स्पष्ट केली. महायुतीतील सर्वांत मोठ्या पक्षाचा नेता म्हणून मी अतिशय अधिकृतपणे सांगतो की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. दुसरे कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही बदल होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. तर, कसिनोसंदर्भात ३० वर्षांपूर्वीचा दाखलाही दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत कुणीही संभ्रम पसरवू नये, असे आवाहनही महायुतीमधील नेत्यांना व कार्यकर्त्यांना केलं आहे. यावेळी, राज्यात ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून ऑनलाइन जुगाराला परवानगी देण्याची चर्चा सुरू आहे का?, असा प्रश्न गृहमंत्र्यांना विचारण्यात आला होता. त्यावरही, फडणवीसांनी स्पष्टीकरण देताना सरकारची भूमिका स्पष्ट केली.
ऑनलाइन गेमिंगला, जुगाराला राज्य सरकार कधीही परवानगी देणार नाही. कुठल्याच प्रकारच्या जुगाराला परवानगी दिली जाणार नाही. एवढच नाही, तर ३० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात कसिनो उघडण्याचा जो कायदा झाला होता, तो कायदा निरस्त करण्याच्या फाईलवर मी मुख्यमंत्री असताना सही केली होती. आता, पुन्हा एकदा त्यासंदर्भातील प्रस्ताव आम्ही तयार केला आहे. ३० वर्षापूर्वी राज्यात कसिनो सुरू करण्याचा जो कायदा केला होता, तो कायदाही आम्ही निरस्त करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
निधीवाटपावरुन फडणवीसांनी फटकारले
निधीवाटपावरून उडालेल्या राजकीय भडक्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधान परिषदेत विरोधकांना फटकारले. माझ्या पाच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात एकदाही निधी मिळाला नसल्याची चर्चा झाली नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महाराष्ट्रात चुकीचा पायंडा पडला. त्यांच्यावेळी विरोधकांना एक फुटकी कवडी निधी मिळाला नाही. तेव्हा शहाणपणा शिकवायचा तर आधीच्या सरकारला शिकवा. तुम्ही गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारू, असे होणार नाही. निधीवाटपात कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा मतदारसंघावर अन्याय होणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर पलटवार केला.
विरोधकांचा होता आरोप
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निधीवाटपावरील स्थगिती कायम आहे. शिंदे-फडणवीस सरकार असमान पद्धतीने निधी वाटप करीत असल्याचा आरोप दानवे यांनी केला. निधीवाटपातील असमानतेचा मुद्दा निकाली काढा, अशी मागणी काँग्रेसचे भाई जगताप यांनी केली, तर आमचा मतदार हा बांग्लादेशचा नागरिक आहे का, असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे सचिन अहिर यांनी केला.