मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन अभिवादन करत आदरांजली वाहिली. चैत्यभूमीसह लगतच्या परिसरात अनुयायांची दरवर्षी दिसणारी प्रचंड गर्दी यंदा दिसली नाही. नागपूरमध्ये मात्र दीक्षाभूमीवर सुरक्षित अंतर पाळून अनुयायांनी अभिवादन केले.दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रविवारी सकाळी ७.४५ ते सकाळी ९ या वेळेत शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर, दर तासाला १० मिनिटांसाठी याप्रमाणे दुपारी १ वाजेपर्यंत सह्याद्री वाहिनीवर थेट प्रसारण करण्यात आले. दूरदर्शन नॅशनल या सुमारे ३३ लाख सबस्क्रायबर असलेल्या यूट्यूब चॅनलवरूनही दूरदर्शनने सकाळपासून दुपारी १ वाजेपर्यंत थेट प्रसारण केले. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. महापालिकेच्या माहिती पुस्तिकेचे, शासनाचे मुखपत्र लोकराज्य या विशेषांकाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.
दीक्षाभूमी, संविधान चौकात अभिवादनाचे सत्रदरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता सामाजिक सुरक्षेचे नियम पाळूनच अनुयायांनी दीक्षाभूमीवर हजेरी लावली होती. स्तुपामध्ये गर्दी होणार नाही, यासाठी एकेका व्यक्तीलाच आतमध्ये प्रवेश दिला जात होता. नमन केल्यानंतर आलेल्या प्रत्येक कुटुंबाने दूर दूर राहून विसावा घेतला. हजारो लोक परिसरात होते, पण अंतर पाळून होते. अनेकांनी घरूनच ऑनलाइन अभिवादन करण्यावर भर दिला. विविध संस्था, संघटनांनी ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करून महामानवाला श्रद्धासुमन अर्पण केले.
बाबासाहेबांनी घडविली सामाजिक क्रांती - ठाकरे मुंबई : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक वैचारिक, सामाजिक क्रांती घडविली. त्यासोबतच त्या क्रांतीला एक दिशा देत त्याला शिस्तीची चौकट घातली. एखाद्या क्रांतीपेक्षा त्याला शिस्तीची चौकट घालण्याचे अवघड काम बाबासाहेबांनी केले. देशाला घटना देणारे, दिशा देणारे बाबासाहेब. त्यांच्यासारखे दुसरे व्यक्तिमत्व भविष्यात निर्माण होणे नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच खा . शरद पवार यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनामुळे वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जनतेला धन्यवादही दिले. राज्यपाल म्हणाले, भगवान बुद्धांनी करुणा, दयेचा जो विचार लोकांना दिला हाच विचार बाबासाहेबांनी स्वीकाराला. याच विचारांच्या आधाराने आपण कोरोनासारख्या संकटावर मात करू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या श्रमाने आणि बलिदानाने पुन्हा एकदा आपला देश नवे शिखर गाठेल, सर्वजणांनी एकत्र येऊन बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करू, आज संपूर्ण देश त्यांना अभिवादन करीत आहे. तर, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंघ, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं संपूर्ण श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला आहे, असे अजित पवार म्हणाले. इंदू मिल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, असेही पवार म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र कोनशिलेचे अनावरणमुंबई : मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे कोनशिला अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी ऑनलाइन झाले. जगाला दिशा देणारा महामानव आपल्या देशात, राज्यात झाला ही अभिमानाची बाब आहे, अशा भावना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.या ऑनलाइन कार्यक्रमात खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, आनंदराज आंबेडकर आदी मान्यवर सहभागी झाले होते.शरद पवार म्हणाले की, संविधान निर्मितीसोबतच धरणांची उभारणी, पाण्याचा योग्य पद्धतीने वापर, विद्युत निर्मिती, कामगारांचे अधिकार अशा विविध क्षेत्रात बाबासाहेबांनी महत्त्वाचे योगदान दिले. ज्या विद्यापीठात बाबासाहेबांनी शिक्षण घेतले त्याच विद्यापीठात आज त्यांच्या नावाने संशोधन केंद्र उभे रहात आहे. त्यांचे कार्य नेहमीच प्रेरणा देत राहील.तर, बाबासाहेबांचे कार्य, त्यांचे विचार याची माहिती विविध भाषांमधून मिळेल. या केंद्राच्या माध्यमातून त्यांचे कार्य आणि विचारांवर संशोधन होऊन ते जगभरात पोहोचेल. यासाठी शासन सहकार्य करेल, अशी ग्वाही सामंत यांनी दिली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर, आनंदराज आंबेडकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.ऊर्जा मंत्री नितीन राऊत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनीही मनोगत व्यक्त करून अभिवादन केले. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केले.