मुंबई : जीवनविद्या मिशनने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षीही ऑनलाइन गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनविद्या मिशनच्या यूट्युब चॅनलवर २३ जुलैपर्यंत गुरुपौर्णिमा अर्थात कृतज्ञता दिन सोहळा साजरा केला जाणार आहे. २३ जुलैपर्यंत साजऱ्या होणाऱ्या साप्ताहिक गुरुपौर्णिमा सोहळ्यात विविध भक्तिरंगाचा आस्वाद घेता येईल.
दरदिवशी सादर होणारे कार्यक्रम हे सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत तीन सत्रात विभागले गेले आहेत. ७ ते ८.३० च्या पहिल्या सत्रात उपासना यज्ञ, मानस पूजा, सद्गुरू वामनराव पै यांचे अमृततुल्य प्रवचन प्रसारित होईल. दुसऱ्या सत्रात सायंकाळी ६ ते ७ या वेळेत गुरुपूजन, नामधारकांचे सुखसंवाद, जीवनविद्येचे प्रसारक यांचे मार्गदर्शन कार्यक्रम असतील. तिसऱ्या सत्रात रात्री ८ ते ९ या वेळेत जीवनविद्येच्या सुरू असलेल्या विविध अभियानासंदर्भातील चित्रफीत, जीवनविद्येचे आजीव विश्वस्त प्रल्हाद दादा पै यांचे प्रवचन असेल.
२१ जुलै ते २३ जुलै ई-ग्रंथदिंडीचा आनंदही घेता येईल. मिशनतर्फे समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जाईल. प्रत्येक दिवशी सैनिक, पोलीस, शेतकरी, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी अशा समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींच्या कामाचा ग्राफिक आणि ध्वनिफितीच्या माध्यमातून गौरव केला जाईल, अशी माहिती जीवनविद्या मिशनतर्फे देण्यात आली.